March 1, 2026
IMG-20251111-WA0067

नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३ अर्ज दाखल

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी पालिकेच्या नगराध्यक्षपदासह दहा प्रभागातून 20 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडले जाणार आहेत. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून चार दिवस कोणताही अर्ज दाखल झाला नसला तरी पाचव्या दिवशी चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मागील आठवड्यात करमाळा नगरपालिकेसाठी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. यानंतर निवडणूक अर्ज भरण्यासाठी असलेला सात दिवसांचा कालावधी लक्षात घेता निवडणूक अर्ज लवकरात लवकर दाखल होणे अपेक्षित होते. मात्र निवडणुकीत उतरलेल्या गट किंवा पक्षांतील नगराध्यक्ष पदासह प्रभागातील जागांच्या उमेदवारीच्या निश्चितीनंतर होणारी नाराजी आणि त्यातून होणारी बंडखोरी टाळण्यासाठी निवडणूक अर्ज भरण्यास गट किंवा पक्षांकडून विलंब केला जात असल्याचे बोलले जात आहे.

या निवडणुकीत भाजप, शिंदे सेना आणि शहरातील सावंत गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जवळपास गेल्या पाच पंचवार्षिक करमाळा नगरपालिकेत अधिपत्य गाजवलेल्या जगताप गटाकडून अनेकांना उमेदवारीची अपेक्षा होती. नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेकडून मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ. नंदीनीदेवी जयवंतराव जगताप यांच्यासह माजी नगरसेविका सौ. संगीता खाटेर यांच्या नावाची प्रकर्षाने चर्चा असून नगरसेवक पदासाठी जगताप गटाकडून ठराविक प्रभागातील ठराविक उमेदवार निश्चित झालेले आहेत तर काही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी समोरील कोण उमेदवार असेल याचा अंदाज घेतला जात आहे. दरम्यान इतर गटांतील इच्छुकांचे प्रवेशही जगताप गटात होताना दिसत आहेत.

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक भाजपा एकत्रित दिसत आहे. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या मावशी तथा विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या अर्धांगिनी सौ. जयश्री घुमरे तसेच भाजपाचे कन्हैयालाल देवी यांच्या धर्मपत्नी सौ. सुनीता देवी यांचे नाव चर्चेत आहे. असे असले तरी नगराध्यक्ष पदासह प्रभागांतील संभाव्य उमेदवारीवरुन स्थानिक भाजपात वातावरण तंग असल्याचे ऐकिवात आहे.

प्रस्थापित गटांबाबत असलेल्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी सावंत गटाने यावेळच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदा सह सर्व प्रभागांतून नगरसेवक पदासाठीचे उमेदवार देण्याचे ठरविले आहे. सावंत गटाकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या अर्धांगिनी सौ. मोहिनी सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे. अपेक्षित गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांचे प्रवेश सावंत गटात होत असताना दिसत असून अधिपत्य असलेल्या प्रभागांसह इतर प्रभागांतूनही उमेदवार निश्चित झाल्याचे सावंत गटाकडून सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी सौ. प्रियंका सिद्धांत वाघमारे यांचा एकमेव अर्ज अपक्ष म्हणून दाखल झाला असून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १० (ब) मधून विजया किसन जानराव यांचा तसेच प्रभाग क्रमांक ७ (ब) मधून सिद्धांत सदाशिव वाघमारे आणि प्रभाग क्रमांक ६ (ब) मधून माजी नगराध्यक्ष प्रशांत मोहन ढाळे असे एकूण तीन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झालेले आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *