June 21, 2026
IMG-20251125-WA0027

वैद्यकीय अधिकारी आणि पारीचारिकेवर हलगर्जीपणाचा आरोप

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील कोर्टी येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे राशीन येथील विवाहितेचा मृत्यू झाला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत पारिचारिकेने या महिलेची प्रसूती केल्याचा आणि त्यामुळे सदर विवाहितेचा मृत्यू झाल्याचा खळबळ जनक आरोप करत सोमवार दिनांक २४ रोजी विवाहितेच्या नातेवाईकांनी कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकून संबंधित डॉक्टर आणि पारिचारीकेला घेराव घातला.

याबाबत माहिती देताना राशीन (ता.कर्जत, जि. अहील्यानगर) येथील योगेश आढाव यांनी सांगितले आहे की शुक्रवार दिनांक २१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या पत्नी सौ. रुपाली योगेश आढाव यांना कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल केले होते. रात्री साडेबाराच्या दरम्यान प्रसूती झाल्यानंतर बराच वेळ झाला तरी रूपाली यांचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. याबाबत योगेश यांच्या सासूंनी योगेश यांना सांगितले. यानंतर योगेश यांनी कर्तव्यावर असलेल्या पारिचारीकेला याबाबत माहिती दिली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर श्रीमती चोरगे यांनी प्रत्यक्षात येऊन रुग्णाची तपासणी करण्या ऐवजी आरोग्य केंद्रानजीक असलेल्या कॉर्टर मधूनच परिचारिका श्रीमती सय्यद यांना मोबाईलवर सूचना दिल्या व त्यानंतर पारिचारिका श्रीमती सय्यद यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना थोड्या वेळात रक्त स्त्राव बंद होईल असे सांगितले.

मात्र बराच वेळ रक्तस्त्राव थांबला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी रूपाली यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रूपाली यांना मृत घोषित केले.

रविवारी सौ. रूपाली यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सोमवारी रूपाली यांच्या पतीसह माहेरच्या नातेवाईकांनी कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपाली यांची प्रसूती वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखी विना पारिचारीकेने केल्याचा आरोप करत कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चोरगे आणि पारिचारिका सय्यद यांना घेराव घालत याबाबतचा जाब विचारला.

याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. काटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसूती वेळी डॉक्टर चोरगे या हजर असल्याची माहिती दिली असून उत्तरीय तपासणीनंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा अहवाल आल्यानंतर सदर महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान सोमवारी दुपारी करमाळा पोलीस स्टेशनचे पो.नि. पी.बी टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांनी नातेवाईकांची समजूत काढून उत्तरीय तपासणी नंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा चौकशी अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आणि आरोग्य केंद्राचे काम सुरळीत केले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!