नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवकांचा पुढाकार
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या दिवाळी सणानिमित्त नगरपरिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ५,००० रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा मोहिनी सावंत आणि उपनगराध्यक्ष अतुल फंड यांची भेट घेऊन सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेत प्रत्येकी ५,००० रुपये अनुदान मंजूर केले.

कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनीही विशेष सहकार्य केले.

सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याबद्दल नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, मुख्याधिकारी सचिन तपसे आणि सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

