March 1, 2026
IMG-20260208-WA0005

किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांसाठी तालुक्यातून एकूण ६१.९२ टक्के मतदान झाले. काही ठिकाणांवरील मतदान यंत्रांमधील बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत आलेला व्यत्यय वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.

शनिवारी सकाळी ७.३० पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. अनेक ठिकाणी धीम्या गतीने मतदान सुरु असताना पोथरे, कात्रज, खातगाव आदी ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या तसेच काही ठिकाणी मतदार यादीतील घोळ, ॲपमध्ये आणि मतदान कक्षात असलेल्या याद्यांमधील नंबर मॅच होत नसल्याने निवडणूक प्रक्रियेत बाधा येत होती. सकाळी लवकर मतदान प्रक्रियेचा वेग कमी असला तरी दहा ते १२ या कालावधीत मतदान प्रक्रियेला वेग आला. यानंतर दुपारी बारा ते तीन दरम्यान मतदान धीम्या गतीने सुरू होते तर तीन नंतर मतदान प्रक्रिया जलद गतीने सुरू असल्याचे सर्वच ठिकाणी जाणवले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तालुक्यात साधारणपणे ६१.९२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली आहे.

सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर साडेनऊ पर्यंत तालुक्यातील एकूण मतदान ६.१४%, साडेअकरा वाजेपर्यंत १८.३६%, दुपारी दीड वाजेपर्यंत ३०.९२%, साडेतीन वाजेपर्यंत ४३.९९% तर साडेपाच वाजेपर्यंत एकूण मतदान ६१.९२% झाले. वीट गटात सर्वाधिक २३,०१९ तर पांडे गटात २२,९५९, कोर्टी गटात २२,३१२, केम गटात २१,५१९, वांगी गटात १९,६५५ आणि चिखलठाण गटात १९,३५२ असे मतदान झाले. अशाप्रकारे सर्व गटांतून एकूण १,२८,८१६ म्हणजेच ६१.९२ टक्के मतदान झाले.

निवडणूक प्रक्रिये दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवत संवेदनशील मतदान केंद्रांवर भेटी दिल्या. सोमवार दि.९ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील दिग्गज पक्ष आणि गटातील उमेदवार असलेल्या ठिकाणी मतदान चुरशीचे झाले असल्याचे दिसून आले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *