करमाळा, प्रतिनिधी – पिकांना पाणी देण्याच्या ऐन दिवसांमध्ये उजनी काठावर असलेल्या मोटारीतील तांब्याची तार काढून येण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा चोरीनंतर शेतकऱ्याला पोलिसांना बोलवावे की मोटार पुन्हा भरून आणून पिकांना पाणी द्यावे की मोटारींना राखण बसावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
करमाळा तालुक्यातील चिखलठाण, पोमलवाडी, खातगाव आदी उजनीलगतच्या भागातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी काठावर बसवलेल्या आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाणी देण्यात सर्वच शेतकरी व्यस्त आहेत. थोडक्या वेळेत होणारा वीजपुरवठा लक्षात घेऊन जेवढा वेळ वीज मिळेल तेवढा वेळात होईल तेवढे भरणे करून शेतकरी इतर कामे उरकत आहेत. अशात काठावर असलेल्या मोटारी बेदरकारपणे खोलून किंवा वेळ पडल्यास तोडून त्यामधील तांब्याची तार चोरट्यांकडून पळवली जात आहे. काठावर अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी लागूनच असल्याने एका चोरीत जवळपास आठ ते दहा मोटारींवर चोर डल्ला मारत आहेत.
मोटारीतील तार आणि केबल चोरीबाबत करमाळा पोलिसात यापूर्वीही अनेक फिर्यादी किंवा तक्रारी दाखल आहेत. गेल्या महिन्यात दि. २२ फेब्रुवारी रोजी पोमलवाडी परिसरातील मोटारीतील तार चोरी झाल्यानंतर पोमलवाडी येथील रामदास बागल यांनी करमाळा पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा तपास प्रलंबित असतानाच शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी दरम्यान त्यांच्याच पुन्हा नव्याने भरून आणलेल्या मोटारीतील तारेची चोरी झाली आहे. याशिवाय बाजूला असलेल्या काठावर सीसीटीव्ही लावलेले असतानाही चोरट्यांनी आधी पोकलेनची काच फोडून चोरीचा प्रयत्न केला आणि सीसीटीव्ही लावलेल्या ठिकाणच्या पाठीमागून काठावर जात येथील अनेक मोटारीतील तार चोरली आहे.
या चोरीबाबत शनिवारी दुपारी रामदास बागल यांच्यासह इतर मोटार चोरीला गेलेले शेतकरी करमाळा पोलिसात फिर्याद देण्यासाठी आले असता करमाळा पोलिसांनी त्यांना घटनास्थळावर येऊन पंचनामा करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र रविवारी दुपार झाली तरी अद्याप करमाळा पोलीस घटनास्थळावर पोहोचले नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मोटारीतील तार ही भंगार म्हणून जवळपास 1000 ते 1100 रुपये किलो दराने विकली जाते. एक इलेक्ट्रिक मोटार रिवाइंडिंग करण्यासाठी जवळपास 15 हजाराच्या पुढे खर्च येतो. याशिवाय चोरट्यांकडून मोटर खोलली किंवा तोडली जात असताना पंखा, बेरिंग, मोटार बॉडी इत्यादी साहित्याचेही नुकसान होते. पिकांना पाणी देण्याचे दिवस असल्याने आम्हाला लगेचच तार चोरी झालेली मोटार भरून आणून बसवणे गरजेचे असते. सीसीटीव्ही बसवूनही महिनाभरात दुसऱ्यांदा तांब्याची तार चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे करमाळा पोलिसांनी मोटारीतील तार चोरांच्या त्वरित मुसक्या आवळणे गरजेचे आहे. -रामदास बागल, शेतकरी, पोमलवाडी, ता. करमाळा. गुन्हा नोंद करताना चोरीस गेलेल्या वस्तूची जुनी वापरती किंमत गृहीत धरली जाते. ही रक्कम रुपये 5000 च्या आत असेल तर या गुन्ह्याची अदखलपात्र म्हणून नोंद घेतली जाते. गुन्हा कोणत्याही प्रकारचा असला तरी त्याचा तपास हा पोलिसांकडून लावला जातोच. अशाच घटनेत निंभोरे येथील शेतकऱ्याची ३२,००० रुपये किमतीची केबल चोरणाऱ्या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. पोमलवाडी येथील चोरीच्या घटनेबाबत संबंधित बीट हवालदार यांना चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे. -रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस स्टेशन.