आम्ही देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर, आमच्या सुरक्षेचे काय -कर्तव्यावर असलेल्या जवानाचा सवाल
करमाळा, प्रतिनिधी – ऑक्टोबर महिन्यात करमाळा तालुक्यातील साडे येथे दरोड्याचा रक्तरंजित थरार घडल्यानंतर मंगळवारी पहाटे पुन्हा त्याच परिसरात दरोडा पडला आहे. या घटनेत साडे येथील शहीद जवानाच्या वीरमातेस एका महिलेस मारहाण करून दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून नेली आहे.
याबाबत साडे येथील शहीद जवान हंबीरराव बापूराव चौधरी यांच्या मातोश्री सिताबाई बापुराव चौधरी (वय-६८ वर्षे) यांनी दि. २४/०३/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा नोकरीस असल्याने त्या साडे येथील चौधरी वस्ती येथील शेती वाट्याने देऊन एकट्याच राहतात. एकट्या राहत असल्याने शेतीत काम करणाऱ्या छबुबाई चंद्रकांत मदने आणि मदने यांचा लहान मुलगा त्यांच्या सोबतीला असतात. सोमवार दि. २३/०३/२६ रोजी हे तिघे जण जेवण करून उन्हाळा असल्याने घराला कडी लावून घराच्या बाहेर झोपले होते. मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास टी शर्ट, पॅन्ट घातलेले व चेहऱ्यावर मास्क घातलेले ७ ते ८ अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व त्यांनी चौधरी यांना गळ्यात घातलेले सोन्याचे दागिने काढ असे म्हणाले. तेव्हा चौधरी या ओरडल्या असता त्यातील एक इसमाने त्यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर लाकडी काठीने जोरात मारुन जखमी केले. तेव्हा त्या घाबरून गेल्या व गळ्यात असलेले सोन्याचे डोरले काढून चोरट्यांना दिले. त्यानंतर दरोडेखोरांपैकी एकाने छबुबाई मदने यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर त्यांनी चौधरी, मदने व लहान मुलाला ओरडलात तर जीवे मारण्याची धमकी देऊन चौधरी यांच्या घराची कडी उघडुन घरात प्रवेश केला व चौधरी यांच्या मुलाची लोखंडी पेटी घेऊन गेले. चौधरी यांच्या घरावरील या दरोड्यात दरोडेखोरांनी अंदाजे एक तोळा वजनाचे ९०,००० रु. किमतीचे सोन्याचे डोरले व मणी, पाच ग्रॅम वजनाचे ४५,००० रु. किमतीचे डोरले व मणी आणि रोख १२,००० रुपये असा १,४७,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या दरोड्या सोबतच दरोडेखोरांनी याच वस्तीवर राहणारे मुकींद सुखदेव घाडगे यांच्याही घरी चोरी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच साडे गावचे पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांनी करमाळा पोलिसांना खबर दिली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासह पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर न्याय वैद्यक (फॉरेन्सिक) आणि श्वान पथकांनी दरोडेखोरांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या सीताबाई यांचे जेष्ठ सुपुत्र स्व. हंबीरराव बापूराव चौधरी हे २०१० साली जम्मू काश्मीर येथील संघर्षात शहीद झालेले आहेत. त्यांचे दुसरे सुपुत्र संतोष चौधरी हे राजस्थान येथील जैसलमेर येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असतात. सैन्य दलातील जवान सीमेवर देशाचे संरक्षण करत असताना गावाकडे असलेल्या त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात असल्याने त्यांनी सीमेवर कोणत्या मनस्थितीत राहायचे असा सवाल सीताबाई चौधरी यांचे दुसरे सुपुत्र संतोष चौधरी यांनी केला आहे. या दरोड्या सोबतच करमाळा शहरातील अमोल जाधव यांच्या फिरंगाई नगर येथील घरातही चोरी झाली आहे. तसेच करमाळा शहरातील देवीच्या रस्त्यावरील डॉ. शेलार यांच्या मातोश्रींच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेण्याचा प्रकार देखील मंगळवारी घडलेला आहे.
.