April 11, 2026
IMG-20260409-WA0036

करमाळा, प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशावेळी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यालयात विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल हाती आल्यानंतर विद्यालयांमध्ये पुढील इयत्तेच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतात. प्रवेश घेते वेळी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या विविध कागदपत्रांची आवश्यकता भासते. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना हे दाखले मिळवण्यासाठी करमाळा तहसील व इतर शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो, तसेच पालकांवर आर्थिक व मानसिक ताण वाढतो. त्यामुळे प्रत्येक विद्यालयात शासकीय दाखल्यांचे कॅम्प आयोजित करून शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे गोळा करावीत व त्याच ठिकाणी दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी लोकाभिमुख मागणी गणेश चिवटे यांनी केली आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *