अटकेची कार्यवाही सुरू
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यात विशिष्ट दिवशी दरबार भरवून भोळ्या भाविकांच्या अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून त्यांना विविध धार्मिक विधी करण्यासाठी सांगून आर्थिक फसवणूक व बुवाबाजी केल्याच्या आरोपावरून तथाकथित भोंदू बाबा मनोहर भोसले याच्यावर नव्याने गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले आहे की, करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर उर्फ मामा भोसले याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलिसांमध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबतच्या फिर्यादीत फिर्यादीने म्हटले आहे की, आरोपी मनोहर भोसले याने फिर्यादीच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत, पूजा किंवा विधी करून आर्थिक परिस्थिती सुधारून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीची फसवणूक करून मानसिक छळ केला आहे.

या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलीसांनी मनोहर व उर्फ मामा भोसले याच्यावर फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून शुक्रवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

आरोपी मनोहर भोसले विरुद्ध यापूर्वी २०२१ मध्ये बलात्कार, विनयभंग तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण हद्दीत एकूण ४ गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी झालेल्या घरात प्रकरणानंतर प्रशासन भोंदूगिरी आणि बुवाबाजी विरुद्ध अधिक सतर्क झाले असून नवीन दाखल गुन्ह्यासह या पूर्वीच्या गुन्ह्यांबाबतही सखोल तपास होण्याची शक्यता आहे. उद्या (शनिवारी) त्याला कोर्टात हजर केली जाण्याची शक्यता आहे.

फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचे आवाहन…
आरोपी मनोहर भोसले वर नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर भोसले विरुद्ध तक्रार असणाऱ्यांनी निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

