महाराष्ट्र दिनानिमित्त विजेत्यांना गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप
करमाळा, प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कार्तिकी हौसराव काळे हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील सर्व शाळांतून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये केंद्र स्तरावरून प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांतून दि.२८/०४/२६ रोजी करमाळा शहरातील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटसाधन केंद्रात तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत शहरातील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कार्तिकी काळे हीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तुत्व परखडपणे मांडत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जेऊर येथील भारत हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शुभांगी संतोष कोंडलकर हीने द्वितीय, मांगी येथील प्रगती विद्यालयाचा विद्यार्थी कु. यशवर्धन संतोष बनसोडे याने तृतीय तर केम येथील उत्तरेश्वर जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. गायत्री शेषराव ओहोळ हीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रु.११,०००, द्वितीय क्रमांक साठी रु. ९,००० तर तृतीय क्रमांकासाठी रु. ७,००० आणि तिन्ही विजेत्यांना प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते. महाराष्ट्र दिनी म्हणजे शुक्रवार दि.१ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोरील ध्वजारोहणानंतर गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, सदस्य भरत अवताडे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, मिनीनाथ टकले, केंद्र प्रमुख रमाकांत गटकळ, संजय मुंडे, विषय प्रमुख विक्रम शेंबडे यांच्यासह पंचायत समितीच्या सर्व विभागांचे प्रमुख, विजेते विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी करमाळा पंचायत समितीच्या गट साधन केंद्राच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

