June 12, 2026
IMG-20260612-WA0010(1)

करमाळा, प्रतिनिधी – क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी यशकल्याणी सेवाभवन येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शहर व तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ४० बहुजन विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भर्तरीनाथ अभंग (माजी संचालक, डीसीसी बँक) होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात प्रगती साधावी, असे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख व्याख्याते डॉ. गणेशभाऊ करे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शैक्षणिक व करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिक परिश्रम व जिद्दीच्या जोरावर यश मिळवावे, असे त्यांनी सांगितले. तसेच मोबाईलचा अतिरेक टाळून पुस्तक वाचनाची सवय जोपासावी, विविध ठिकाणांची भ्रमंती करून ज्ञान संपादन करावे व त्याचा जीवनात उपयोग करावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी सौ. ललिताताई शिरसकर (पंचायत समिती सदस्य, करमाळा), रोहिदास सातव (माजी पंचायत समिती सदस्य, करमाळा), ज्ञानदेव अनारसे (माजी व्यवस्थापक, अर्बन बँक करमाळा), डॉ. महेश अभंग, नेमचंद भुजबळ, सुभाष अभंग, दत्ता भुजबळ, सुरेश शिंदे, शहाजी मोहोळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिलांचाही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग होता. यामध्ये सौ. शितलताई करे-पाटील, सौ. अनिता राऊत, सौ. प्रमिला जाधव (पत्रकार), सौ. निशिगंधा शेंडे, सौ. मीनल बनसोडे, सौ. स्वाती नाळे, सौ. सुनीता भुजबळ व सौ. स्वाती मोहोळकर यांची विशेष उपस्थिती होती.

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुनीलजी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अर्जुन आगम, विवेक अवसरे, सागर बनकर, विशाल बनकर, अमोल नाळे, मयूर यादव, अशोक ननवरे व समाधान दगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ जाधव सर यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळू दुधे सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांना भविष्यासाठी प्रेरणा देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!