वृक्षदाना सह संवर्धनासाठीही प्रयत्न
करमाळा, प्रतिनिधी – विविध प्रसंगांचे औचित्य साधून अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमानंतर लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन अनेक वेळा दुर्लक्षित राहते. मात्र करमाळ्यातील हॉटेल व्यवसायिक आकाश चिवटे हे आपल्या वाढदिवसानिमित्त गेल्या सहा वर्षांपासून विविध ठिकाणी कडुनिंब, वड, पिंपळ, जांभूळ, आंबा आदी निसर्गोपयोगी रोपांचे वाटप करून आणि त्यांच्या संवर्धनासाठी संरक्षक जाळी देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस करतात. केवळ वृक्षारोपण करून मोकळे न होता वृक्षांच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष देण्याचे यंदाचे त्यांचे सहावे वर्ष आहे.
लहानपणापासूनच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या वृत्तीने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आकाश चिवटे यांनी कोरोना कालावधी पासूनच म्हणजे 2021 पासून स्वतःच्या 12 जून रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध देशी वृक्षांची रोपे विविध ठिकाणी देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प आरंभला आहे. करमाळा शहरालगतच्या श्रीदेवीचा माळ आणि श्री खंडोबाचा माळ येथून त्यांच्या या संकल्पाला सुरुवात झाली आहे. यानंतर लेकीचे झाड ही संकल्पना राबविणाऱ्या धायखिंडी येथेही त्यांनी आतापर्यंत शेकडो वृक्षांची रोपे दिली आहेत. रोपे देऊन वृक्षारोपण झाल्यानंतर या वृक्षांच्या संवर्धनासाठीही त्यांचे प्रयत्न असतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या रोपांची आज मोठी झाडे झालेली दिसून येतात.
यावर्षीही शुक्रवार दि.१२ रोजी धायखिंडी येथील गायराना भोवताली तब्बल शंभर विविध देशी जातीच्या वृक्षांची लागवड स्वतः आकाश यांच्यासह धायखिंडी गावच्या सरपंच अनिता मोटे, पोलीस पाटील तुकाराम मोटे, ग्रामपंचायत सदस्य दादा वायकुळे, हर्षल शिंगाडे, आत्माराम वायकुळे, संतोष महानवर, तेजस महानवर, आदिनाथ लांडगे, बाबा सलगर, शंभू सलगर, लाला वाघमोडे, बापूराव महानवर, जिल्हा परिषद शाळेच्या सोरटे मॅडम, भोसले मॅडम, अंगणवाडी शिक्षिका पारेकर मॅडम, सुवर्णा निकम, आशा देवकते, सोनू खामगाव, बाळा खामगळ, नाना वायकुळे, बाळू जेडगे, सुभाष वायकुळे, भानुदास लांडगे, परमेश्वर वाडेकर, संदीप मोटे, तुकाराम मोटे, बापू निकम, मधुकर वायकुळे, बापू वाघमोडे, गोवर्धन शिंदे, योगेश वायकुळे, लखन खटके, सुमित देवकते आणि राशीन पेठ तरुण सेवा मंडळाचे अक्षय चिवटे, ओम चिवटे, प्रीतम खुटाळे, ॲड. विश्वजीत चिवटे, दिग्विजय चिवटे, सुप्रसिद्ध तबलावादक विनायक गुरव यांनी श्रमदान करून केली.
यानंतर धायखिंडी येथील जिल्हा परिषद शाळा परीसरात पूर्वी लावलेल्या आणि आता मोठ्या झालेल्या वृक्षांच्या सोबतीत आकाश चिवटे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व श्रमदानकर्ते उपस्थित होते. जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. या दृष्टीने माझ्याकडून घडणारा हा उपक्रम अतिशय छोटा आहे. या उपक्रमाला मोठ्या स्वरूपात प्रतिसाद मिळण्यासाठी शासनासह सामाजिक कार्यकर्ते, संघटना आणि राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या वाढदिवसासह इतर सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे उपक्रम राबविल्यास जागतिक तापमान वाढ रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. -आकाश चिवटे, चिवटे रेस्टॉरंट आणि उपहारगृह, करमाळा.
.
.
.