करमाळा, प्रतिनिधी : वीरशिरोमणी हिंदुसूर्य श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) करमाळा शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती तसेच करमाळा तालुका सकल क्षत्रिय राजपूत समाज यांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

जयंतीनिमित्त आज मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुतार गल्ली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवजवान सुतार तालीम येथे हे शिबिर पार पडणार आहे. यानंतर उद्या बुधवार दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता मंगळवार पेठ येथील हिंदुसूर्य श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात येणार आहे. यासोबतच अभिषेक संपन्न झाल्यानंतर सकाळी ९ वाजता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.

जयंतीनिमित्त उद्या (बुधवारी) सायंकाळी ५ वाजता सुतार गल्ली येथून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक निघणार आहे. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिवा काशिद यांच्यावर आधारित ऐतिहासिक जिवंत देखावा, सादर करण्यात येणार असून यासोबतच पारंपरिक वाद्यपथके आपली कला सादर करणार आहेत.

महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या प्रेरणादायी विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये शहर व तालुक्यातील सर्वच समाजबांधव सहभागी होणार आहेत.

.

.

.

.

