टेम्पोचालकावर गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – भरधाव वेगातील टेम्पो वळणावर पलटी झाल्यामुळे टेम्पोच्या पाठीमागे धान्याच्या पोत्यांवर बसलेल्या एका अल्पवयीन मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून सोबत असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. करमाळा तालुक्यातील फिसरे गावानजीकच्या वळणावर हा अपघात झाला असून मयत मुलाच्या नातेवाईकाने टेम्पो चालकाविरुद्ध करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत जेजेराम चांगदेव पाटुळे (वय-६५, रा. कासारी ता. भुम जि. धाराशिव) यांनी दि.१३/०६/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 02/06/2026 रोजी पहाटे 05/00 वाजण्याच्या सुमारास टाटा 407 टेम्पो क्र.एम एच 14 सी डी 1463 वरील चालक बापु प्रल्हाद पाटुळे (रा. कासारी ता. भुम जि. धाराशिव) याने त्याचे ताब्यातील टेम्पो करमाळा-कुर्डूवाडी रोडवरील फिसरे गावाच्या जवळील वळणावर रस्त्याच्या परीस्थीतीकडे लक्ष न देता हयगयीने भरधाव वेगात चालविला. त्यामुळे टेम्पो रोडच्या खाली खडयात जाऊन पलटी झाला.

या अपघातामुळे टेम्पोच्या पाठीमागील बाजूस पोत्यावर बसलेले मारूती नाना गायकवाड (वय-५५ वर्षे, रा. वारेवडगाव ता. भुम सध्या पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर, डोक्यास व डाव्या हाताच्या मनगटास गंभीर दुखापत झाली तर डाव्या पायाची नडगी मोडली. तसेच फिर्यादीच्या पत्नी कावेरी जेजेराम पाटुळे (वय-६० वर्षे) यांच्या डोक्याला, तोंडाला आणि खांद्याला गंभीर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात टेम्पोच्या पाठीमागे बसलेला आदर्श प्रभाकर पाटुळे (वय-13 वर्षे) याला कपाळावर गंभीर मार बसला तसेच डावा हात मोडला.

अपघातानंतर तिघाही जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी आदर्श याला तपासून तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले तर कावेरा यांच्यावर उपचार सुरू केले. या अपघातात मारुती गायकवाड यांना जास्त मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यास सांगितले होते.

पाटूळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी टेम्पो चालक बापु प्रल्हाद पाटुळे याच्यावर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ सह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

