करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील मांगी तलावातून हाळगाव येथील कृषी महाविद्यालयास पाणी देण्याचा निर्णय हा पूर्णपणे मंत्रालयीन स्तरावर घेण्यात आला असून, या निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकरी, पाणी वापर संस्था व ग्रामपंचायतींची बाजू आगामी पावसाळी अधिवेशनात आमदार नारायण आबा पाटील सभागृहात मांडणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली आहे.

मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश नसल्याने हा विषय कुकडी सल्लागार समितीच्या बैठकीत आला नसल्याचे सांगत तळेकर यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर नव्हे तर मंत्रालयीन स्तरावर झाल्याचे स्पष्ट केले. आमदार पाटील यांनी मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश आणि प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेद्वारे उजनीचे पाणी तलावात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे आणि करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कृषी महाविद्यालयास पाणीपुरवठ्याचा करार केवळ सहा वर्षांसाठी असून तो कायमस्वरूपी नाही. पाणीटंचाईच्या परिस्थितीत पुरवठ्यात कपात करण्याचा अधिकार जलसंपदा विभागाकडे असून पाण्याची कोणतीही हमी शासनाने दिलेली नाही, असेही करारातील अटींमध्ये नमूद असल्याचे तळेकर यांनी सांगितले.

मांगी तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसह बोरगाव व इतर गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून स्थानिकांच्या हिताचे प्रश्न आ. नारायण पाटील अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही तळेकर यांनी शेवटी सांगितले आहे.

.

.

.

