लाखोंचा खर्च करूनही नागरिकांना मोकाट जनावरांचा कायमचाच त्रास
करमाळा, प्रतिनिधी – मोकाट जनावरांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरपालिकेकडून शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकली जातात. मात्र या कोंडवाड्याच्या अस्वच्छतेसह पाणी आणि चाऱ्याच्या अभावामुळे या जनावरांना करमाळा नगरपालिकेच्या कोंडवाड्यात मात्र नरक यातना भोगाव या लागत आहेत.

करमाळा शहरात सध्या चालू असलेल्या नगरपालिकेच्या रस्त्यावरच जुन्या मुख्याधिकारी निवासाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत केवळ भिंतींचा आडोसा करून आणि दर्शनी भागाला लोखंडी गेट लावून प्रशासक कालावधीत विना छताचाच हा कोंडवाडा सुरू करण्यात आला आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी करमाळा नगरपालिकेने टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. जनावर पकडून कोंडवाड्यात टाकण्यासाठी सध्या प्रतिजनावर रुपये 3000 खर्च येत असला तरी प्रशासक कालावधीत मात्र प्रती जनावर रुपये आठ हजारांच्यावर हा खर्च आल्याची माहिती नगरपालिकेकडून मिळाली आहे.

आषाढी वारीपूर्व खबरदारी म्हणून शहरातील काही गोवंश पकडून त्यांना कोंडवाड्यात डांबण्यात आले आहे. मात्र या कोंडवाड्यात स्वच्छतेसह चारा, पाणी आणि निवाऱ्याच्या अभावामुळे या जनावरांना नरकयटना भोगाव्या लागत आहेत. मंगळवार दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी नगरपालिकेकडे जाताना या ठिकाणच्या दुर्गंधीने लक्ष वेधल्यानंतर तेज वार्ता प्रतिनिधीने या कोंडवाड्यात डोकावले असता येथे प्रचंड अस्वच्छता तर आढळून आलीच याशिवाय येथील जनावरांना चारा टाकला जात असल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत आणि यावर कहर म्हणून जनावरांना पाणी पिण्यासाठी ठेवण्यात आलेली सिमेंटची टाकी मोकळी असल्याचे आढळून आले. करमाळा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोंडवाड्यातील जनावरांची योग्य निगा राखली जात असल्याचे सांगितले गेल्याने दुपारी या जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात येत असावी म्हणून दुपारपर्यंत वाट पाहिली. मात्र मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता आरोग्य निरीक्षक विपुल पुजारी यांना जनावरांचा चारा आणि पाण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी साडेसहा वाजताच जनावरांना चारापाण्याची सोय करण्यात आल्याचे तसेच याबाबतचे फोटो पाठवत असल्याचेही सांगितले. मात्र मोबाईल जवळ नसल्यामुळे सदर कर्मचाऱ्याने मंगळवारी सायंकाळचे फोटोच काढले नसल्याचे पुजारी यांच्याकडून नंतर सांगण्यात आले.

दुपारनंतर रात्री दहा वाजेपर्यंत कोंडवाड्याच्या गेटला कुलूप असल्याचे तसेच या ठिकाणी कोणताही कर्मचारी फिरकला नसल्याचे तेजवार्ता प्रतिनिधीच्या निदर्शनास आले. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास पुन्हा या ठिकाणी पाहिले असता अनेक दिवसांपासून कोंडवाड्यात साचलेला कचरा नगरपालिकेचे काही स्वच्छता कर्मचारी उचलत असल्याचे दिसून आले. स्वच्छतेनंतर टँकरद्वारे सदर टाकीमध्ये पाणी टाकण्यात येणार असल्याचे तसेच जनावरांना चारा टाकण्यात येणार असल्याचे या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले.

गोवंशाची वाहतूक करताना तसेच त्यांचे पालन करताना त्यांना चारा आणि औषध-पाण्याची सोय न करता, त्यांच्या निवाऱ्याची योग्य व्यवस्था न ठेवल्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाल्याचे पाहण्यात येते. मात्र करमाळा नगरपालिकेच्या कोंडवाड्यात असलेल्या गोवंशाची ही प्रचंड अव्यवस्था पाहता त्यांच्या योग्य देखभालीसाठी गोरक्षक पुढे का येत नसावेत, हा प्रश्न पडतो आहे. एवढे सगळे घडत असूनही शहरात मात्र मोकाट जनावरांचा त्रास कायमचा असल्याचे चित्र आहे.

.

.

.
