September 19, 2026
IMG-20260917-WA0015

विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन

करमाळा, प्रतिनिधी – शहराच्या मुख्य बाजारपेठेतील राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहासह महिला मेळावा घेऊन निर्भया पथकाबाबत जनजागृती करण्याच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

सोमवारी श्री गणेशमूर्ती आगमन व प्राणप्रतिष्ठापना पार पडल्यानंतर मंगळवार दि. १५ ते सोमवार दि. २१ सप्टेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये दररोज सकाळी ८ ते १० व १०.३० ते १२ अशा दोन सत्रात सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण होत आहे तर रात्री आठ ते दहा या वेळेत विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सुरू आहेत.

यासोबतच सामाजिक उपक्रम म्हणून सोमवार दि.२१ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर, महाप्रसाद व पथनाट्य तर मंगळवार दि.२२ सप्टेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्यात सोलापूर ग्रामीणच्या सहा. पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा, पोलीस निरीक्षक रणजीत माने, निर्भया पथकाच्या स.पो.नि. गिरीजा म्हस्के आणि पो.कॉ. मंगेश पवार यांच्याकडून निर्भया पथकाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वृक्षारोपणाचा उपक्रम होणार आहे तर गुरुवार दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने वाजता संत बाळूमामा यांच्यावर आधारित जिवंत देखावा सादर केला जाणार आहे.

शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता राशिन पेठ तरुण सेवा मंडळाच्या गणेशमूर्तीची पारंपारिक वाद्यांसह भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. गणेशोत्सवा दरम्यान दररोज सकाळी १० वाजता आणि रात्री ८ वाजता शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती होत असून राशिन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्व उपक्रमांमध्ये शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!