November 2, 2026
IMG-20261101-WA0036

करमाळा, प्रतिनिधी – देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे सध्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत स्वतः फिरुन माहिती घेत असुन त्यांचा दुष्काळ पाहणी दौरा होत असताना उद्या सोमवारी दिनांक २ नोव्हेंबर रोजी ते करमाळा तालुक्यातील वीट परिसरातील दुष्काळी परिस्थितीबाबत पाहणी करणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे.

याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, शरदचंद्रजी पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात आज मी स्वतः त्यांची बारामती येथे भेट घेतली. यावेळी पवार साहेब यांच्या समोर करमाळा तालुका व माढा तालुक्यातील कुर्डुवाडीसह छत्तीस गावातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती बाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच करमाळा मतदारसंघातील गावांचीही आपण पाहणी करुन शेतकऱ्यांचे मनोबल वाढवावे अशी विनंती केली असता त्यांनी येण्यास होकार दिला आहे.

यानुसार त्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या मार्ग व नियोजनानुसार वीट ता. करमाळा येथील शेतकऱ्यांशी दुपारी दोन वाजता ते स्वतः प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. तसेच वीट व कोर्टी परिसरातील पिक नुकसानीची प्रत्यक्ष फिल्ड वर जाऊन पाहणी करतील असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!