दिग्विजय बागल यांनी सुयोग्य भूमिका घेण्याची विनंती
करमाळा, प्रतिनिधी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान शहरातील विसंगत राजकीय परिस्थिती मतदारांच्या डोक्याचे दही करत असताना या परिस्थितीशी सुसंगती साधणारी घटना करमाळा तालुक्यात घडली आहे. विधानसभेच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा लढविलेल्या दिग्विजय बागल यांनी विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील विविध भागातील बागल समर्थक सोबत घेऊन तालुक्यात शिवसेनेच्या तब्बल ५५ शिवसेना शाखा स्थापन केल्या होत्या. मात्र तालुक्यातील राजकारणात शिवसेना नेते म्हणून दिग्विजय बागल यांना विचारात घेतले जात नसल्याचे कारण पुढे करत शनिवारी या सर्वच्या सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी करमाळ्यात एकत्र होत आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सध्या करमाळा शहरात नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापत आहे. या निवडणुकीसाठी मागील अनेक वर्षांपासून पालिकेवर वर्चस्व असलेल्या जगताप गटासह त्या खालोखाल अधिपत्य असलेला बागल गट आणि शहरातील दोन ते तीन प्रभागांची अखत्यारी असलेला सावंत गट हे निवडणुकीत उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना निवडून आणण्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र त्यानंतर जगताप यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला असून शिवसेनेच्या बॅनरखाली ते करमाळा नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. करमाळा आणि कुर्डूवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक प्रभारी म्हणून पक्षाकडून नेमणूक करण्यात आलेली आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार धैर्यशील मोहीते पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्यासोबत राहिलेल्या सावंत गटाने करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने स्वतंत्रपणे पॅनल उभा केला आहे.

बागल गटाचा विचार करता रश्मी बागल या भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा असून भाजपाच्या वतीने करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्या पत्नी म्हणजेच बागल यांच्या मावशी सौ. जयश्री घुमरे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पुढे केले असून नगरसेवक पदासाठीचे सर्वच्या सर्व वीस उमेदवार भाजपाच्या बॅनरखाली उतरवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र बागल कुटुंबातीलच दिग्विजय बागल हे शिंदे सेनेचे पाईक असल्याने ते कोणाचा प्रचार करणार, याबाबतच्या चर्चा राजकीय क्षेत्रातून कानावर पडत होत्या.

ही विसंगती लक्षात घेऊन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेच्या ५५ शाखा स्थापलेल्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बागल कार्यालयात एकत्र येत आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. जगताप यांना शिवसेनेचे उमेदवार निवडण्याचे अधिकार दिले गेल्यामुळे दिग्विजय यांना शिवसेना विचारात घेत नसल्याचे सांगत त्यांनी दिग्विजय बागल यांनाही सुयोग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

करमाळा नगरपालिकेची निवडणूक महायुतीच्याच घटक पक्षांत होणार असल्याचे स्पष्ट आहे. आता दिग्विजय बागल हे कुटुंबासोबत भाजपाचा प्रचार करणार की शिवसेनेचे पाईक असल्यामुळे शिवसेनेचा प्रचार करणार, हा यक्षप्रश्न आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर दिग्विजय बागल हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी हे शिवसेनेचे विचार तळागाळात पोहोचवत असताना शिवसेनेने त्यांना विचारात घेणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षाच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी असतात. मात्र नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमचे नेते दिग्विजय बागल यांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना पदाधिकारी अस्वस्थ झाले असल्याने त्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून दिग्विजय बागल यांनाही योग्य निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
सतीश नीळ,
संचालक, मकाई सह. सा. कारखाना.

.

.

