March 1, 2026
IMG-20251118-WA0033

मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर कापला केक…

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिका निवडणूक कार्यक्रमा दरम्यान इतर सर्व अधिकाऱ्यांसह निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांना आणि पत्रकारांना अरेरावीची भाषा करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर केक कापून करण्यात आला. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी ११ ते ३ ही वेळ निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेची असताना दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला आहे.

करमाळा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह जवळजवळ सर्वच अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नव्याने निवडणूक कार्यक्रमाला नव्याने सामोरे जात आहेत. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने अनेक उमेदवारांना कागदपत्रांबाबत विविध अडचणी येत होत्या. या अडचणी किंवा शंकांचे निरसन नवख्या अधिकाऱ्यांना करणे जड जात होते. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्याकडून इच्छुक उमेदवारांना असलेल्या शंकांचे निरसन करून त्याबाबतच्या सूचना नगरपालिकेच्या कार्यालयात डकवणे अपेक्षित होते. मात्र अर्जांबाबतच्या शंकांविषयी त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे काही इच्छुकांनी पत्रकारांकडे बोलून दाखवले.

मात्र पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करताच त्यांनाही निवडणूक अधिकाऱ्यांच्या उर्मट वागणुकीचा प्रत्यय आला. त्यांच्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजावर कोणतीही सूचना नव्हती. यावेळी एक इच्छुक उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांना शंका विचारत असतानाचा फोटो माध्यमांना देण्यासाठी एक पत्रकार प्रतिनिधीने फोटो काढण्यासाठी मोबाईल धरला असता निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्रकारासह शंका विचारण्यास आलेल्या व्यक्तीला आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना सर्वांसमोर जोरजोरात बोलून अपमानास्पद वागणूक दिली.

यानंतर अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराबाबत विचारण्यासाठी एक ज्येष्ठ पत्रकारासह शहरातील काही पत्रकार गेले असता यावेळीही निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांनी त्यांना हलक्यात घेऊन दालनातून निघून जाणे पसंद केले.

निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांच्या मते ते नियमानुसार सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडत असल्याच्या अविर्भावात आहेत. मात्र मंगळवारी काही पत्रकार कार्यालयीन माहिती विचारण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाजवळ गेले असता मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर निवडणूक निर्णय अधिकारी पारगे हे काही खाजगी व्यक्तींसह आपल्या वाढदिवसाच्या केक कापताना निदर्शनास आले.

शासकीय कार्यालयात वाढदिवस किंवा समारंभ साजरे करू नयेत, असा शासन निर्णय असताना आणि स्वतःला कर्तव्यदक्ष किंवा कार्यतत्पर समजणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांना या शासन निर्णयाचा विसर कसा पडला, याचे कुतूहल या पत्रकार मंडळींना वाटले. मात्र पूर्वानुभवावरून याचा जाब विचारण्याचे धारिष्ट्य मात्र या पत्रकार मंडळींनी टाळले.

निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांनी केक कापल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहिले असून नगरपालिकेच्या सीसीटीव्ही मध्येही हा प्रकार कैद झालेला असेलच. शासन नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांना वाढदिवस साजरा करता येत नाही. या उपरही एखाद्या अधिकाऱ्याने शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा केला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
-नासीर कबीर,
जेष्ठ पत्रकार., करमाळा.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *