करमाळ्यातील सभेत पालकमंत्र्यांची कोटींची उड्डाणे
करमाळा, विशाल परदेशी – पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आदी सुविधांसाठी निधी मिळविण्यासाठी सत्ता आणि कमिशन वाटून घेणाऱ्यांऐवजी शहराच्या विकासाची खात्री देणाऱ्या भाजपाला निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळ्यातील नागरिकांना केले. नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील सुभाष चौक येथील शुक्रवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते.

शहराच्या विकासासाठी असलेल्या भाजपाच्या जाहीर नाम्याचे प्रकाशन करत ना. गोरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. शहरातील खराब रस्त्यांमुळे होणारी प्रचंड धूळ, अस्वच्छता, विस्कळीत पाणीपुरवठा, नागरिकांच्या जीवाशी खेळ आदी समस्यांचे दाखले देत या समस्यांसाठी कारणीभूत असलेल्यांना मते मागण्याचे धाडस होतेच कसे असा सवाल ना. गोरे यांनी सभेला उपस्थित जनतेला केला. नगराध्यक्ष म्हणून काम केलेले आणि त्यांचेच ठेकेदार म्हणून निकृष्ट काम केलेले पॅनल विरोधात उभे असून ते धाडसाने मते मागण्यासाठी येतात. अस्वच्छ आणि अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, अनारोग्य यामुळे नागरिकांचे आयुष्यमान कमी केलेल्यांनी करमाळ्याच्या शोषिक जनतेला मते मागण्याचा अधिकार नसल्याचे ना. गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कालखंडामध्ये देशाच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलला असताना स्वातंत्र्यपूर्व काळाच्या शंभर वर्षांपूर्वीची नगरपालिका असलेल्या करमाळा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच विकास पोहोचेल, याची खात्री देत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनिता देवी या नगराध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत शहराच्या सर्व रस्त्यांना मंजुरी आणण्याची तसेच लवकरात लवकर शहराला अद्ययावत पाणी योजना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करून देण्याची जबाबदारी ना. जयकुमार गोरे यांनी या जाहीर सभेत घेतली आहे.

असुविधांमुळे दयनीय अवस्था असलेल्या शहराच्या नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही विरोधक पॅनलनी निवडणूक झाल्यावर एकत्र येऊन परस्परांचा फायदा करून घेण्यासाठी मतांच्या खरेदीचा बाजार मांडल्याचे ना. गोरे यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले असून शहराच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी
भारतीय जनता पक्षाच्या विचारांची नगरपालिका एकदा निवडून देण्याचे ठाम आवाहन ना. गोरे यांनी आपल्या भाषणात केले आहे.

जातीय समीकरणे मांडून मते लाटणारांपेक्षा विकसित करमाळ्याची ओळख अभिमानाने सांगण्यासाठी चांगला राजकीय वारसा असलेल्या, कमिशनची अपेक्षा न ठेवणाऱ्या, रश्मी बागल, दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, गणेश चिवटे, प्रा . रामदास झोळ आदींचा पाठिंबा असलेल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत देवी यांना निवडून भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेल्या, लाडक्या बहींणींना सन्मानाची वागणूक मिळवून देणा-या आणि सरकारच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनिता देवी यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी देण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेवटी केले आहे.

.

