March 1, 2026
IMG-20251212-WA0051(1)

करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, प्रख्यात समाजसेवक, सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योती, सत्यशोधक, कामगार चळवळीचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने श्रमिकांबरोबरच उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी नेतृत्व करत असलेला लाखो कामगारांचा आधारवड गेला असल्याचे मत करमाळा तालुका हमाल पंचायत अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी व्यक्त केले आहे. करमाळा तालुका हमाल पंचायत तर्फे शहरातील हमाल भवन येथील डॉ. बाबा आढाव यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

यावेळी ॲड. सावंत पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबा आढाव हे अन्यायाच्या अंधारात उभे असलेले एक दीपस्तंभ होते. सर्वसामान्य घरात जन्मलेले स्व. आढाव हे डॉक्टर होऊन सुखात जगू शकले असते पण भुकेलेल्या कामगारांचे आक्रोश त्यांच्या कानावर पडले आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा मार्ग बदलला. त्यांच्या योगदानामुळे पुण्यासह राज्यातील हमाल, तोलार, फेरीवाले, डोक्यावर वजन वाहणारे मजूर, कचरा वेचणारे, रिक्षावाले, टेम्पोवाले अशा अनेक उपेक्षितांना आज सन्मानाने जगता येत आहे. स्व.आढाव यांनी केवळ संघटना उभी केली नाही तर त्यांनी आपणही माणूस आहोत हा विसरलेला भाव कामगारांच्या मनात पुन्हा रुजवला. त्यांचा आवाज मोठा नव्हता, पण मनाची पकड अपार होती. त्यांनी कोणाला हरवण्यासाठी संघर्ष केला नाही, ते हरवलेल्यांना उभे करण्यासाठी लढले. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळ ही भीतीने नव्हे तर तत्त्वाने चालली.

या समाजसेवकाच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील एक समाजवादी नेतृत्व पडद्याआड गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे ॲड. सावंत यांनी शेवटी सांगितले. यावेळी भिमराव लोंढे व दिपक उबाळे यांनीही बाबां विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी करमाळा तालुका हमाल पंचायतचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *