करमाळा, प्रतिनिधी – शेत जमिनीचे जिवंत हिस्सेदार मयत दाखवून जमिनीच्या खरेदीच्या खोट्या व्यवहारात सहभागी असलेले एक एक मासे गळाला लागत चालले आहेत. या व्यवहारात आर्थिक लाभापायी फेरफार नोंद कायम करून प्रमाणीत केलेल्या तत्कालीन मंडल अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे.

तालुक्यातील पोथरे येथील गट नं. ३९४ चे हिस्सेदार हयात असताना तत्कालीन तलाठी तानाजी भगवान खुळे यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरूपयोग करून तत्कालीन मंडळ अधिकारी हरिचंद्र आत्माराम बिनवडे यांच्या संगणमताने हिस्सेदारांना कागदोपत्री मयत दाखवुन खोटा ७/१२ उतारा बनवून त्याआधारे खरेदी केलेल्या जमीन गैरव्यवहारा बाबत करमाळा पोलीसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील तत्कालीन मंडळ अधिकारी हरिचंद्र आत्माराम बिनवडे यांनी कायदेशीर तरतूदींचे व नियमांचे पालन न करता बेकायदेशीररीत्या फेरफार नोंद कायम करून प्रमाणीत केली होती. बिनवडे यांनी नियमबाह्य पध्दतीने ही नोंद मंजुर केल्यामुळेच सदर शेतजमीनीचे पुढे वारंवार गैरव्यवहार घडत गेले.

या खोट्या व्यवहाराबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील तत्कालीन मंडळ अधिकारी बिनवडे यांनी बार्शी येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपांचे स्वरूप गंभीर असल्यामुळे आणि त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने बार्शी येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. मलकालपट्टे यांनी सदरचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

यात तक्रारदार तर्फे ॲड. आय. के. शेख, ॲड. मनिषा घाडगे आणि ॲड. सागर फडतरे यांनी तसेच सरकार तर्फे ॲड.गोरे यांनी काम पाहीले.

.

