ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षेत ७३२ विद्यार्थ्यांचा सहभाग
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून घेतले जाणारे उपक्रम हे शालेय विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असल्याचे मत युवा पत्रकार ॲड. विशाल घोलप यांनी व्यक्त केले. ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक प्रा. महेश निकत यांनी तालुक्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गुरुवार दि.२५ आणि रविवार दि.२८ रोजी सकाळी साडेदहा ते साडे अकरा या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. युवा पत्रकार ॲड. विशाल घोलप, सिद्धार्थ वाघमारे, विशाल परदेशी आणि गौंडरे येथील डॉ. हेडगेवार माध्यमिक प्रशालेचे उपशिक्षक प्रा. गोफणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या परीक्षेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना ॲड. घोलप यांनी सांगितले की स्पर्धेच्या युगात करमाळा तालुक्याची शैक्षणिक स्थिती मागास असली तरी अलीकडील काही वर्षांमध्ये ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विविध शालेय उपक्रम घेतले जात असल्याने तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. स्पर्धा म्हटले की विविध परीक्षा आणि परीक्षा म्हटले की महागडे क्लासेस असे समीकरण असताना प्रा. निकत यांच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माफक खर्चात ज्ञानदान केले जात आहे. इन्स्टिट्यूटच्या अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार असून त्यांचे भवितव्य उज्वल होणार आहे. ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षेला पात्र होण्यासाठी सर्व विद्यालयांमधून पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड होऊन ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट येथे केंद्र परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना रोख रक्कमेचे बक्षीस आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशमध्ये १.५ लाखापर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याचे प्रा . निकट यांनी सांगितले आहे. इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.४ जानेवारी रोजी प्रा नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून यावेळी या परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.
मुख्याध्यापक प्रा.अमृत सोनवणे, मुख्याध्यापक प्रा. मोहोळकर, मुख्याध्यापक अनिल जाधव, प्रा कदम, प्रा. गवळी यांनी या परीक्षेचे नियोजन केले. या परीक्षेत ७३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
.