March 1, 2026
IMG-20251231-WA0022(1)

पाईपलाईन, शेती, पशुधनासह ग्रामदैवतेचा रस्ता संकटात

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील वाशिंबे येथील गायरानामध्ये प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पामुळे धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकल्पामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने वाशिंबे ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे.

गैरसोईच्या असलेल्या या प्रकल्पाच्या विरोधासाठी सर्व ग्रामस्थ एकवटले आहेत. जवळपास ६० शेतकऱ्यांनी उजनीतून शेतीला पाणी घेण्यासाठी अमाप खर्च करून गावालगत असलेल्या गायरानातून पाईपलाईन टाकलेल्या आहेत. इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही केवळ याच ठिकाणी हा प्रकल्प होण्याचा अट्टाहास होत असल्याने या शेतकऱ्यांना त्यांच्या पाईपलाईन काढाव्या लागणार आहेत. मोठ्या स्वरूपात असलेल्या या प्रकल्पामुळे परिसराचे वातावरण बदलून लगतच्या रहिवासी क्षेत्राचे तसेच शेतीचे नुकसान होणार आहे. गायरान म्हणून राखीव असलेली जागा अशा प्रकल्पाला वापरल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना अडचणी तर येणारच आहेत मात्र ग्रामदैवतेकडे जाणारा रस्ताही या प्रकल्पामुळे प्रतिबंधित होणार असल्याने भाविकांच्या भावनेचा प्रश्नही निर्माण होणार आहे.

शेतीचा पाणीपुरवठा धोक्यात…

या पाईपलाईनच्या माध्यमातून वाशिंबे व राजुरी गावातील धरणग्रस्त शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आहे. पाईपलाईन हटवल्यास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ग्रामदैवताच्या रस्त्यावर कायमस्वरूपी अडथळा

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वाशिंबे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता कायमस्वरूपी बंद होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

फळबागा व निर्यातक्षम शेती धोक्यात

वाशिंबे परिसरात ऊस, केळी, पेरू, वेलची केळी तसेच विविध फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. विशेषतः वाशिंबे येथील वेलची केळीला आखाती देशांमध्ये तसेच मोठ्या रिटेल मॉलमध्ये मोठी मागणी आहे. सौर प्रकल्पामुळे या फळबागांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन बंद होणार आहे.

पशुधनाच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार…

सदर गायरान जमिनीचा वापर गावातील गुरे चारण्यासाठी केला जातो. पशुवैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार वाशिंबे गावात ३,१४४ इतकी पशुधन संख्या आहे. सौर प्रकल्प उभारल्यास चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन पशुपालक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावणार आहे.

आधीच मोठ्या प्रमाणात भूसंपादन…

यापूर्वी उजनी धरणामुळे वाशिंबे परिसरातील ९०० एकरहून अधिक जमीन संपादित झाली आहे. तसेच पुणे–सोलापूर रेल्वे लोहमार्गासाठीही मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाले आहे. अशा परिस्थितीत नव्याने प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प शेती व पशुधनासाठी अधिक त्रासदायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी…

या सर्व कारणांमुळे धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांकडून वाशिंबे येथील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

“फळबागा फुलाव्यात, ऊस मळे हिरवेगार व्हावेत आणि घराघरांत वीज पोहोचावी म्हणून आम्ही आमची गावे व भवितव्य धरणाच्या घशात घातले. सोलापूर जिल्हा सुजलाम–सुफलाम व्हावा म्हणून विकासाचा नारळ फोडताना दगड म्हणून आमचीच डोकी वापरली गेली. या त्यागाचा लाभ जिल्ह्यासह मराठवाडा व मोठ्या शहरांना झाला. धरण आणि रेल्वे—दोन्हींसाठी जमिनी गेल्या तरी आम्ही पुन्हा उभे राहिलो. पण आता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली धरणग्रस्तांवर पुन्हा वनवास लादला जात आहे. एकदा सर्वस्व दिलं, आता आमचं अस्तित्व तरी शिल्लक ठेवा—सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करा.”
-कल्याण मगर, प्रगतिशील शेतकरी,
वाशिंबे, ता. करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *