करमाळा, प्रतिनिधी – शुक्रवार दि.९ रोजी देशभक्त स्व. नामदेवरावजी जगताप (साहेब) यांची १०६ वी जयंती करमाळ्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या स्व. नामदेवरावजी जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चिंतामणी नामदेवरावजी जगताप, राहुल नामदेवरावजी जगताप आणि प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी बोलताना करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी सांगितले की, करमाळ्याच्या पवित्र मातीत जन्मलेले देशभक्त नामदेवरावजी जगताप हे केवळ एक नाव नव्हते, तर स्वातंत्र्याची धगधगती मशाल होते. गुलामगिरीच्या काळोख्या रात्रीत त्यांनी सत्य, त्याग आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित केला. ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीपुढे न झुकता, छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी ठेवून त्यांनी देशासाठी उभे राहण्याचे धैर्य दाखवले. स्वतःचे सुख, संसार, आराम बाजूला ठेवून त्यांनी “देश प्रथम” हा मंत्र जपला.

करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल जगताप यांनी सांगितले की, करमाळ्याच्या गावागावात जाऊन त्यांनी तरुणांच्या मनात स्वराज्याची ज्वाला पेटवली. त्यांच्या आवाजात भीती नव्हती, तर बलिदानाची तयारी होती. त्यांच्या पावलांमध्ये थकवा नव्हता, तर मातृभूमीसाठी मरण्याची जिद्द होती. स्वातंत्र्य मिळाले… पण नामदेवरावजी जगताप थांबले नाहीत. त्यांनी समाजाला सांगितले — स्वातंत्र्य मिळवणे सोपे नव्हते, ते जपणे ही आपली पवित्र जबाबदारी आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, गरीब-शेतकरी-कामगार यांच्या बाजूने उभे राहणे, आणि पुढच्या पिढीला संस्कार देणे — हेच त्यांच्या आयुष्याचे अंतिम ध्येय होते.

तसेच स्व. देशभक्त नामदेवरावरावजी जगताप सहकारी रुग्णालयाचे सर्वेसर्वा प्रतापराव जगताप यांनी सांगितले की, आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो, तिरंगा अभिमानाने फडकतो, कारण नामदेवरावजी जगताप साहेबां सारख्या असंख्य देशभक्तांनी आपल्या आयुष्याचा होम केला. त्यांच्या स्मृतींना वंदन करताना डोळे पाणावतात, पण मन अभिमानाने भरून येते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच जगताप बंधुंचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. नितीन चोपडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

.

.

