निरागस भाऊ-बहीण ठरले पित्याच्या मानसिक त्रासाचे बळी…!!!
करमाळा विशाल परदेशी – स्वतःच्या दोन अपत्यांना विहिरीत टाकून जीवे मारल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर अपराधी पित्या विरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पित्याच्या मानसिक त्रासाचे नाहक बळी ठरलेल्या शिवांश जाधव आणि श्रेया जाधव (वय-०८ वर्षे) या निरागस बालकांच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत राजुरी येथील वैजीनाथ नवनाथ सारंगकर दि.१०/०१/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची बहिण वैशाली यांचे पती सुहास ज्ञानदेव जाधव, (रा. पारेवाडी स्टेशन, केतुर नं. २, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे करमाळा तालुक्यातील झरे येथे एम.एस.ई.बी. मध्ये ऑपरेटर म्हणून नोकरी करतात. दि.१० रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी फोन केला व सांगितले की, “मी मानसीक त्रासामध्ये दोन्ही मुले हिंगणी, (ता. करमाळा) येथील शेतातील विहीरीत टाकली आहेत आणि मी ही विषारी औषध पिलो आहे. मी सोलापूरला जात आहे.”
सुहास यांच्या फोननंतर वैजीनाथ यांनी त्यांच्या घराशेजारी राहणारे नातेवाइक संजय चंद्रभान दुरंदे यांच्या सोबत त्यांच्या बहिणीच्या घरी (केतुर नं.२) येथे जाऊन बहिण वैशाली यांना दाजी व मुले कोठे आहेत असे विचारले असता त्यांनी सांगितले की, सुहास हे शिवांश आणि श्रेया यांना घेऊन सकाळीच शेतात गेले आहेत. त्यामुळे वैजीनाथ हे दुपारी २:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दाजींच्या हिंगणी येथील शेतामध्ये पोहोचले. त्यावेळी शेतातील विहीरीच्या काठावर बरेच लोक जमलेले होते व पोलीसही आले होते. त्या ठिकाणी वैजीनाथ यांना श्रेया विहीरीच्या पाण्यावर मयत अवस्थेत तरंगत दिसली. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी श्रेया शिवांश यांचे प्रेत पाण्यातुन बाहेर काढले व करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेले.
सुहास जाधव यांनी त्यांची जुळी मुले श्रेया व शिवांश यांना स्वतःच्या मानसीक त्रासामुळे हिंगणी येथील त्यांच्या विहीरीत फेकुन देऊन त्यांना ठार मारल्यामुळे वैजीनाथ यांनी सुहास यांच्याविरुध्द दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर सोलापूर कडे जात असल्याचे सांगून विष प्राशन केलेल्या सुहास याला करमाळा पोलिसांनी बार्शी येथून ताब्यात घेतले असून त्याच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. अधिक माहिती घेतली असता सुहास जाधव याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे. उप निरीक्षक सचिन बनकर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान रविवारी सकाळी साडेअकरा वाजता दोन्ही मयत बालकांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदानानंतर रविवारी दुपारी केतुर येथे दोन्ही बालकांवर एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
.