करमाळा, प्रतिनिधी – शेतातील मोटार बाहेर काढण्यासाठी दुचाकी वरून जात असलेल्या दोघांना कारने धडक दिल्यामुळे दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. करमाळा शहरानजीकच्या धर्मसंगीत मंगल कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला आहे.
याबाबत निखील अतुल क्षिरसागर (रा. तेलीगल्ली, करमाळा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१०/०१/२६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांचे वडील अतुल वसंत क्षिरसागर (वय-४५ वर्षे, रा. तेली गल्ली, करमाळा) हे हिरो स्प्लेंडर क्र. एम एच ४५ बी बी ५९७६ वरुन त्यांचे मित्र महादेव जगन्नाथ सुरवसे (वय ६० वर्षे, रा. भोसे ता. करमाळा) यांच्यासह शेताकडे जात होते. यावेळी करमाळा-कर्जत रस्त्यावर धर्मसंगीत मंगल कार्यालयाच्या समोर त्यांना ह्युंदाई मॅग्ना कार क्र. एम एच ४५ ए ४५६० चा चालक प्रणव श्रीपाद जोशी (रा. किल्ला विभाग, करमाळा) याने त्याच्याकडील कार हयगयीने, वेगात चालवून धडक दिली. या अपघातात फिर्यादी निखिल यांचे वडील अतुल वसंत क्षिरसागर यांना डोक्याला, हाताला व अंगावर जबर मार लागून उपचारा दरम्यान ते मयत झाले. तसेच अतुल यांच्यासोबत असलेले महादेव जगन्नाथ सुरवसे यांनाही पाठीला, छातीला व अंगावर जबर मार लागुन ते गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचेही तुटफूट होऊन नुकसान झाले.
निखिल यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी या अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी कारचालक प्रणव श्रीपाद जोशी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पोलीस नाईक चंद्रकांत गोरे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महाकाल रुग्णवाहिकेच्या रोहित लष्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली आणि जखमींना वाचवण्यासाठी तातडीने करमाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अतुल यांना जबरदस्त मार लागल्यामुळे ते वाचू शकले नाहीत.
.
.