वाहनांचे नुकसान होत असल्याने शेतमाल वाहण्यासाठी अडचणी
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील शेटफळ-केडगाव-चिकलठाण रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय असलेला हा रस्ता नव्याने करणे गरजेचे असताना अनेक वेळा मागणी करूनही कित्येक वर्षांमध्ये या रस्त्याची साधी डागडुजी सुद्धा न झाल्यामुळे ही न झाल्यामुळे केडगाव येथील ग्रामस्थांनी करमाळा तहसील कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

शुक्रवार दि. ३० रोजी दिलेल्या या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, शेटफळ ते केडगाव आणि केडगाव ते चिखलठाण रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने चिखलठाण आणि जेऊरला जाणारे विद्यार्थी, वयस्कर आणि आजारी व्यक्तींची गैरसोय होते. रस्ता खराब असल्यामुळे एस.टी. केडगाव येथे न येता जेऊर शेटफळ मार्गे चिखलठाणला जाते. तसेच केडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस, केळी बागा असल्याने या शेतमालाच्या वाहतुकी दरम्यान वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनधारक या परिसरातील भाडे नाकारतात.

या कारणांमुळे केडगाव ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घातला असल्याचे या निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या वतीने सहा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे निवेदन स्वीकारले.

.

.

.
