March 1, 2026
IMG-20260131-WA0026

बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने जगताप-बागल यांचे मनोमिलन

करमाळा, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी राहिलेल्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत “मानाचे पान” न दिले गेल्याने उद्विग्न झालेल्या जगताप यांनी या निवडणुकीपासून काही काळ अलिप्तता पाळली होती. परंतु मागील अनेक निवडणुकांतील राजकीय घडामोडी लक्षात घेता मा.आ. जगताप स्वस्थ बसणार नाहीत, असे जाणकारांकडून बोलले जात होते. याच अपेक्षेनुसार शनिवारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मा.आ. जयवंतराव जगताप यांनी तत्कालीन विधानसभा उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या काही प्रचार सभांना उपस्थित राहून त्यांना आमदार होण्यासाठी मोलाची मदत केली होती. यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यात आधी जगताप आणि शिंदे यांच्यात दुरावा आल्यानंतर त्यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी राहून त्यांना आमदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. असे असताना करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत जगताप यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एका प्रचार सभेत विद्यमान आमदार यांना निमंत्रण असतानाही या सभेला त्यांची उपस्थिती जाणवली नव्हती. यावेळी आ.पाटील यांना काही राजकीय प्रोटोकॉल पाळावे लागत असल्याचे गृहीत धरून मा.आ. जगताप यांनी त्यांची अनुपस्थिती गांभीर्याने घेतली नव्हती. दरम्यान नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या केवळ पाच जागांवर समाधान मानत मा. आ. जगताप यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात उत्स्फूर्त कार्यकर्ता मेळावाही घेतला होता.

मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जगताप यांच्या वाट्याला “अपेक्षित” जागा न मिळाल्याने उद्विग्न होत त्यांनी या निवडणुकीत अलिप्त राहण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत बोलून दाखवला होता. मात्र असा दगा फटका त्यांना नवीन नसल्याने काही काळ संयम बाळगत त्यांनी पुन्हा भाजपा-राष्ट्रवादीच्या युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकरवी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्याशी हात मिळवणी केली असल्याचे समजते आहे.

येत्या दोन दिवसात करमाळा येथे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जगताप, बागल व शिंदे यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत या घडामोडीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते आहे. जगताप यांच्या या निर्णयामुळे करमाळा तालुक्याचे संपूर्ण राजकीय समीकरणच बदलणार आहे. जगताप यांनी ज्या ज्या वेळी एखाद्या गटाला किंवा राजकीय पक्षाला साथ दिली आहे, त्या पक्ष किंवा गटाला विजय मिळाल्याची अनेक अनुभव असल्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युतीला फायदा होणार हे निश्चित आहे.

मा.आ. जगताप यांच्या अलिप्ततेचा फायदा घेण्यासाठी भाजपचे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न

मा.आ. जगताप यांच्या अलिप्ततेचे संधीत रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने पालकमंत्री गोरे व बार्शीचे माजी आ. राऊत यांच्या पुढाकाराने जगताप, शिंदे व बागल यांच्यात ही समेट घडवून आणली गेली आहे.

वचप्याच्या राजकारणाची चर्चा

२०१८ च्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी पाटील आणि बागल यांनी दगाफटका करून पाटील गटाचे तत्कालीन संचालक प्रा. शिवाजीराव बंडगर यांना सभापती करुन मा.आ. जगताप यांच्या ३० वर्षांच्या सभापतीपदाला सुरूंग लावल्याचा जगताप यांचा समज होता. यातून त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जगताप यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मा.आ. संजयमामा शिंदे यांना पाठिंबा जाहीर करत त्यांना आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जगताप आणि तत्कालीन आमदार शिंदे यांच्यात दरी निर्माण झाली. यावेळी जगताप यांनी नारायण पाटील यांना साथ देत त्यांना आमदार करण्यात मदत केली होती. मात्र नगरपालिका निवडणुकीपसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदार पाटील यांच्याकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपा-राष्ट्रवादी युतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या घडामोडींना आजवर “वचप्याचे राजकारण” म्हटले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *