टीकात्मक प्रचारावर भर
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांतील कुरघोडीच्या राजकारणामुळे सर्वच राजकीय गट कमकुवत झाले आहेत. एकमेकांना शह कटशह देण्यासाठी तालुक्याच्या बाहेरून आधार घेतला जात असल्याने गटांची स्वतंत्र विचारसरणी विरत चालली आहे. अशामुळे तालुक्यातील राजकीय गट/पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले असून विकासाचे मुद्दे मागे पडल्याने निवडणूकीत केवळ टीकात्मक प्रचारावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात जगताप, बागल, पाटील, शिंदे असे चार प्रमुख राजकीय गट आहेत. अलीकडील काळात वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मा.आ. शिंदे वगळता इतर सर्व गटांनी सोयीनुसार पक्षीय आधार घेतलेला आहे. मात्र शिंदे अपक्ष राहत असले तरी त्यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्याशी नेहमी एकनिष्ठ भूमिका राखली आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार असलेले नारायण पाटील हे स्थानिक करमाळा तालुका विकास आघाडीच्या बॅनरखाली, बागल आणि शिंदे हे भाजपा राष्ट्रवादी युतीच्या नावाखाली एकत्र निवडणूक लढवत आहेत तर खासदार मोहिते पाटील यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी तुतारी या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहेत. जगताप यांनी सुरुवातीला या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उमेदवाऱ्या निश्चित झाल्यानंतर त्यांनी पाटील यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे आदरातिथ्य करत शनिवारी भाजपा राष्ट्रवादी युतीला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या गटांचे खंदे समर्थक समजल्या जाणाऱ्या काही दिग्गजांनीही एकमेकांच्या गोटात उड्या घेतलेल्या आहेत.

तालुक्यातील प्रमुख गटांच्या या सर्व भूमिका एकमेकांविरोधात असलेल्या पक्ष किंवा गटांना शह कटशह देण्यासाठी आणि आपल्या गटाचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी घेतल्या गेल्या आहेत. स्व. अजितदादांच्या निधनाचा दुखावटा पाळून झाल्यानंतर हे सर्व गट प्रचारासाठी जोमाने सरसावले असले तरी तालुक्यातील प्रलंबित रिटेवाडी उपसा सिंचन प्रकल्प, बंद अवस्थेत असलेले तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने, तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी आदी मुद्दे झाकरीत ठेवून केवळ एकमेकांची उणी दुणी काढून निवडणूक प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे.

.

.

