March 1, 2026
IMG-20260210-WA0043

वाढदिवसाच्या निमित्ताने घुमरे यांच्याकडून “रिटर्न गिफ्ट”

करमाळा, प्रतिनिधी – विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे (सर) यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडले. शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील यशवंत परिवाराच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सरांच्या दि.६ फेब्रुवारी रोजी असलेल्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात यशवंत परिवारातील सदस्य, एनसीसी, एनएसएस आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एकूण ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या घडवून आणला.

यानंतर वाढदिवसा दिवशी म्हणजे शुक्रवार दि.६ रोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सरांच्या हस्ते गोळा फेक मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरांनी क्रीडांगणातील झाडांना संरक्षक जाळ्या आणि संपूर्ण क्रीडांगणाला कंपाऊंड करण्याचे आश्वासन दिले. सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात विलासराव घुमरे (सर) आणि त्यांच्या पत्नी सौ. जयश्रीताई घुमरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आयोजित व्याख्यानात प्रख्यात व्याख्याते जयवंत आवटे (कुंडल) यांनी विनोदी शैलीत विद्यार्थ्यांश संवाद साधत धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात नातेसंबंध घट्ट ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले आणि सत्कारमूर्ती विलासराव घुमरे सरांविषयी गौरवोद्गार काढले.

प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी आपल्या प्रास्ताविकातून घुमरे सरांचा जीवनपट उलगडून सांगत सरांनी शुन्यातून सुरुवात करून लोकांमध्ये प्रेम, राजकारणात महत्त्वाचे स्थान आणि स्वकर्तुत्वाने निर्माण केलेले वैभव सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

आप्तजनांनी केलेले सत्कार हे मला उतारवयात उर्जा देतात. ही उर्जा टिकवून ठेवण्याचे काम माझ्या आयुष्यात यशवंत परिवार दरवर्षी करीत आलेला आहे. यशवंत परिवाराच्या या उपक्रमाचा मला नेहमी अभिमान वाटतो.
-विलासराव घुमरे,
सचिव, विद्या विकास मंडळ, करमाळा.

वाढदिवसानिमित्त घुमरे सरांनी महाविद्यालयाला मौल्यवान भेटवस्तूंसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांची पुस्तके, महाविद्यालयातील दोन एकर क्षेत्रातील वृक्षांच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण आणि स्वच्छ भारत अभियानासाठी ३१ डस्ट बीन भेट म्हणून दिले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, विश्वस्त प्रा. संभाजी किर्दाक, सुनबाई सौ. कोमलताई घुमरे, कवीवर्य सुरेश शिंदे, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, माजी प्राचार्य नागेश माने, प्रा. शीलवंत सर, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राजेंद्र घाडगे आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे पत्रकार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता भोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. हा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *