- करमाळा तालुक्यातील हिवरे गाव प्रकाशझोतात
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ लिखित ‘भारतीय संविधान आणि लोकशाही अमृतमहोत्सवी वाटचाल: एक दृष्टिक्षेप’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

प्रसिद्ध वक्ते व संविधान अभ्यासक प्रा. ॲड. संभाजी मोहीते यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजकीय विश्लेषक केशव वाघमारे, लेखक श्रीरंजन आवटे, प्रा. नितीन तळपाडे, सागर काकडे, ह्रदयमानव अशोक, पैगंबर शेख आणि मतीन शेख यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केशव वाघमारे यांनी डॉ. ओहोळ यांचे हे पुस्तक घटनात्मक मूल्यांची महत्त्वाची मांडणी करणारे एक प्रभावी साधन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला तर श्रीरंजन आवटे यांनी डॉ. ओहोळ यांच्या चिंतनाचे कौतुक त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला वेध वर्तमानातील आव्हानांना भिडणारा असून, तो भविष्याची दिशा स्पष्ट करत असल्याचे मत व्यक्त केले. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना दै. ‘सकाळ’चे संपादक श्रीराम पवार डॉ. ओहोळ यांचे हे पुस्तक मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारे आहे असल्याचे सांगितले आहे.

प्रियदर्शन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक ४४४ पृष्ठांचे असून ते दोन भागांत आणि सतरा प्रकरणांत विभागलेले आहे. हे पुस्तक केवळ सामान्य वाचकच नव्हे, तर अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे.

वडील सुभाष ओहोळ यांनी आंबेडकरी सामाजिक चळवळीत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामाचा वारसा जपत, डॉ. जयसिंह प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रियतेच्या जोरावर शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

