करमाळा, प्रतिनिधी – तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री आदिनाथ महाराज यांच्या महाशिवरात्रीनिमित्त पार पडलेल्या दोन दिवसीय यात्रेनंतर संत निरंकारी मंडळाच्या करमाळा शाखेच्या वतीने मंदिराचा अंतर्बाह्य परिसर तसेच सीना नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. रविवार दि.२२ रोजी पार पडलेल्या या उपक्रमात तालुक्यातील २०० महिला-पुरुषांनी श्रमदान करून संपूर्ण परिसर लख्ख केला.

सदगुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ पासून ‘अमृत जल प्रोजेक्ट’ अंतर्गत संत निरंकारी मिशन व भारत सरकारच्या संयुक्त विचार प्रणालीतून संपूर्ण देशभरात ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ या अभियानाच्या माध्यमातून देशव्यापी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यावर्षी रविवारी संपूर्ण भारतात १६०० पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळेस नदीपात्र किंवा लोकोपयोगी पाण्याचे तलाव येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. प्रशस्त मंदिर व भव्य मैदानात ही यात्रा भरत असल्याने त्याच प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छता ही होते. त्यामुळे संत निरंकारी मंडळाच्या करमाळा ब्रँचच्या वतीने रविवारी श्री आदिनाथ मंदिर अंतर बाह्य स्वच्छ करण्यात आले तसेच नदीपात्रात जमा झालेल्या शीतपेयांच्या बाटल्या, पुठ्ठ्याचे बॉक्स, खाद्यपदार्थांची वेस्टने आधी अस्वच्छता नावेच्या सहाय्याने मंडळाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छ केली.

संत निरंकारी मिशनच्या वतीने दरवर्षी संपूर्ण भारतात वृक्षारोपण अभियान, रक्तदान शिबीर, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य व स्वच्छता अभियान असे मानवतेसाठी उपयोगी उपक्रम निष्काम भावनेने राबवले जातात. श्रीक्षेत्र संगोबा मंदिराचा अंतर्बाह्य परिसर व सिना नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी करमाळा शहरासह तालुक्यातील जातेगाव, कामोणे, पोटेगाव, पांगरे, नेरले, निंभोरे, शेलगाव, उमरड, वाशिंबे, चिखलठाण, दहिगाव, केतूर, जवळा, केडगाव या ठिकाणांहून २०० महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. हे अभियान राबवण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे ब्रँचमुखी पोपट थोरात, सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे यांच्यासह सर्व महिला व पुरुष सेवादल तसेच आत्माराम वायकुळे, डॉ. भाऊसो सरडे, मुकुंद साळूंके, अंगद पडवळे, बप्पा धडस, तानाजी चव्हाण, मोहन चोरमले, योगेश चव्हाण, इन्नूस शेख, राजेंद्र भुजबळ, दादा आव्हाड, शिवाजी हजारे, राजू कारंडे या सर्वांनी परिश्रम घेतले.

.

.

.

.

