विक्रीसाठी मद्य पुरवणाऱ्या परवाना धारकांचे धाबे दणाणले
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असतानाच पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. गुरुवार दि. ५ रोजी त्यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तालुक्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी करत मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जप्त केला आहे. यावेळी वाशिंबे परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत नामांकित कंपन्यांची महागडी ब्रँडेड दारू जप्त करण्यात आली आहे.

परवाना धारकांकडून ब्रँडेड दारूचा पुरवठा
वाशिंबे येथील ‘शिवबाबा हॉटेल’च्या आडोशाला पोलिसांनी छापा टाकला असता, निलेश मारुती बदे (वय-३०) याच्या ताब्यातून रॉयल स्टॅग, मॅकडॉल नं. १, ब्लेंडर्स प्राईड, इम्पेरिअल ब्लू आणि मॅजिक मोमेंट यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूचा २७,०५५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, ही ब्रँडेड दारू जेऊर येथील ‘गायकवाड देशी दारू दुकान’ आणि ‘हॉटेल लोकप्रिय’ येथून अवैध विक्रीसाठी पुरवण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन करून अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या या दोन्ही परवाना धारकांना पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी सहआरोपी करत त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल केले आहेत.

सावडी येथील मंदिर परिसर आणि सावडी फाटा येथेही कारवाया
केवळ ब्रँडेड दारूच नव्हे, तर सावडीतील भवानी माता मंदिरालगत सुरू असलेल्या हातभट्टी विक्रीवरही पोलिसांनी धाड टाकली. मंदिराचे पावित्र्य भंग करणाऱ्या रोहिदास शिवदास जाधव (वय-६३) याला २० लिटर गावठी दारूच्या कॅनसह अटक करण्यात आली. तसेच सावडी फाटा येथे हॉटेल नवनाथच्या आडोशाला चोरून दारू विक्री करणाऱ्या प्रथमेश शिवाजी झाकणे (वय – २२,रा. कुस्करवाडी) याच्या जवळ ३० देशी दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या आणि विहाळ परिसरातही विहाळ-मोरवड रस्त्यावर एका निनावी टपरीच्या आडोशाला चोरून दारू विकणाऱ्या संदीप जनार्दन कांबळे (रा. विहाळ, वय – ४८) याला अटक करून ३,०८० रु किंमतीच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

अवैध व्यावसायिकांना उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा यांचा इशारा
या मोहिमेत एकूण ३४,०५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, ही कारवाई पो.हवा. रवी लोकरे, पो.कॉ. अनिल निकम, मनजित भोसले, संभाजी पवार आणि गणेश गुटाळ यांच्या पथकाने फत्ते केली. तालुक्यात कोणताही अवैध धंदा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी दिला आहे. त्यांच्या या ‘अॅक्शन मोड’मुळे करमाळा, माढा, आणि कुर्डूवाडी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

.

