March 1, 2026
IMG-20260210-WA0050

नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालय द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा, प्रतिनिधी – आजकाल कर्णकर्कश पाश्चात्य संगीत आणि त्यावर आधारित बिभत्स नाचाचे पेव फुटले असताना करमाळकरांना रविवारी शास्त्रीय संगीत आणि नृत्याचा सुगम कलाविष्कार अनुभवास आला. गझलकार तथा भरतनाट्यम् शिक्षिका मितवा श्रीवास्तव-अग्रवाल यांच्या नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालयाद्वारे शहरातील केमिस्ट भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

गटविकास अधिकारी मनोज राऊत, डॉ.अपर्णा भोसले, डॉ. सत्यपाल श्रीवास्तव यांच्या हस्ते नृत्यराज नटराज पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी गटविकास अधिकारी राऊत, डॉ. भोसले, जयश्री वीर, अनुराधा शिगची आणि वालचंद माने यांनी आपल्या मनोगतातून कलेचे महत्त्व सांगून सौ. मितवा यांच्या भरतनाट्यम् हा शास्त्रीय नृत्यप्रकार करमाळा शहरात रुजवण्याच्या कार्याचे कौतुक केले. यानंतर नृत्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी जिजाऊ प्रशस्ती,अंगिकम्, नमस्कार, पुष्पांजली, लक्ष्मी स्तोत्र, गणेश वंदना इत्यादी भरतनाट्यम् नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांनी बक्षीसे दिली.

कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पहिली आणि दुसरी भरतनाट्यम् परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनींना प्रमाणपत्र व सहभागी विद्यार्थ्यांना कौतुकपत्र देण्यात आले. यासोबतच नृत्यालयातील विद्यार्थिनींच्या पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नृत्यालयाच्या संचालिका सौ. मितवा यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. रेणुका दळवी यांनी सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमाला नृत्यलयातील विद्यार्थिनींच्या पालकांसह शहरातील रसिकांनी गर्दी केली होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

सामाजिक कार्यकर्त्या तथा प्रसिद्ध लेखिका सौ. अंजली श्रीवास्तव यांच्या प्रेरणेने आणि पुणे येथील मयूरीताई जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम् शिक्षिका सौ. मितवा यांनी तीन वर्षांपूर्वी शास्त्रीय भरतनाट्यम् नृत्यालयाची सुरूवात केली. पालकांनी सौ. मितवा यांच्या या गरजेच्या उपक्रमाला प्रतिसाद देत आपल्या मुलींना नृत्याचे क्लास लावले. या क्लासच्या माध्यमातून करमाळ्यात शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अभिजात कला जोपासली जात आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *