करमाळा, प्रतिनिधी – रात्री आठची वेळ, कॅनॉलच्या कडेची निर्जन वाट, दाट झाडीमुळे करवंदी म्हणून ओळखला जाणारा परिसर, त्या रस्त्यावरून ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन जाणारा एकटा शेतकरी आणि त्याच्यासमोर उभा ठाकलेला बिबट्या… एखाद्या धाडसी कथेला अनुरूप प्रसंग आणि त्या प्रसंगाला तेवढ्याच धाडसाने तोंड देणारा प्रौढ शेतकरी… शुक्रवारी सायंकाळी उशिरा करमाळा तालुक्यातील वीट येथे हा थरार प्रत्यक्ष घडला आहे.

त्याचे झाले असे की, वीट येथील रेवणनाथ प्रल्हाद गाडे हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या ट्रॅक्टर-ट्रॉली वरून मका पिकाची भाडोत्री वाहतूक करत होते. इच्छित ठिकाणी मका पोहोचवून ते एकटेच परत निघाले होते. रात्री आठच्या सुमारास वीट येथील भोंग वस्ती लगतच्या मेन कुकडी कॅनॉल चारी क्र. ८७ च्या बाजूच्या रस्त्याने जात असताना ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात त्यांना समोर बिबट्या उभा असलेला दिसून आला. अरुंद रस्त्याने मागे फिरणे शक्य नसल्याने रेवणनाथ यांनी ट्रॅक्टर पुढे घेण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर येत असलेला पाहून बिबट्या ती जागा सोडून निघून जाण्याची अपेक्षा होती, मात्र रेवणनाथ यांनी ट्रॅक्टर पुढे घेण्याचा प्रयत्न करताच सदर बिबट्याही आव्हानात्मक नजरेने पुढे झेप घेण्याच्या पावित्र्यात असल्याचे रेवणनाथ यांच्या लक्षात आले.

समोर पूर्ण वाढ झालेला बिबट्या उभा ठाकलेला असताना इतर कोणाचीही भीतीने भंबेरी उडाली असती, मात्र रेवणनाथ यांनी या अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचे ठरवले आणि आपल्या मोबाईल वरून वीट येथील रघुनाथ भोंग, प्रकाश ढेरे आणि सचिन गणगे यांना मदतीसाठी पाचारण केले. बरोबर आठ वाजून तीन मिनिटांनी बिबट्या आणि रेवणनाथ यांची गाठ पडली होती. भोंग, ढेरे आणि गणगे यांना घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बरोबर साडेआठ वाजले. दरम्यान रेवणनाथ यांच्यासह भोंग, ढेरे आणि गणगे यांनी गावातील इतर तरुणांनाही बिबट्या दिसल्याची माहिती दिली. रेवणनाथ यांच्याजवळ पोहोचताच ट्रॅक्टरच्या हेडलाईट सह बॅटरीच्या प्रकाशात या चौघांनाही बिबट्याने मनसोक्त दर्शन दिले आणि ट्रॅक्टरच्या आवाजासह मदतीला आलेल्या व्यक्तींच्या आरडाओरडा करण्याने बिबट्याने या ठिकाणाहून काढता पाय घेतला आणि रेवणनाथ यांची अडवून ठेवलेली वाट मोकळी केली आणि शांतपणे चारीतून वाट काढत पुढे जाधव वस्तीच्या दिशेने निघून गेला.

एव्हाना करवंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात वीट ग्रामस्थांसह करमाळा पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी यांची गर्दी झाली आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी स्वतः ट्रॅक्टर मध्ये बसून पुढे निघून गेलेल्या बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

रात्रीची वेळ असल्याने तसेच परिसरात अनेक छोट्या वस्त्या असल्याने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे परिसरातील कुटुंबांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिबट्याबाबतच्या अधिक माहितीसाठी वनविभागाच्या आयेशा शेख यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. (प्रत्यक्ष घडलेल्या या माहीतीच्या संकलनासाठी वीट गावातील सामाजिक कार्यकर्ते तेजस ढेरे आणि राजेंद्र भोंग यांचे सहकार्य लाभले आहे.)

.

