पक्षाच्या आधारवर गटातटांची चंगळ
करमाळा, विशाल परदेशी – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे इच्छुकांना गत पंचवार्षिक संपल्या पासूनच लागलेले आहेत. त्यादृष्टीने त्या त्या गट किंवा गणातील इच्छुक पुर्वीपासूनच तयारीत आहेत. मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन तीन दिवस लोटले तरी संलग्न राजकीय गटांच्या संभाव्य युत्यांचे घोडे अडल्यामुळे इच्छुक उमेदवार मात्र संभ्रमात पडले आहेत. सध्या राजकीय गटांकडून समर्थकांना केवळ अर्ज घेऊन भरून ठेवण्यास सांगण्यात येत आहेत. आजचा दिवस (सोमवार दि.१९) जमेला धरता अर्ज भरण्यासाठी केवळ तीनच दिवस उरले असून तालुक्यातील राजकीय गटांत किंवा राजकीय पक्षात काय वाटाघाटी होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील सर्व निवडणुका पूर्वीपासून गटातटावर होत आल्या असल्या तरी अलीकडील काळात या गटांना राजकीय झालर जोडली जात असली तरी या पक्षांचा वापर केवळ आर्थिक पाठबळासाठीच होत असल्याचे मागील काही निवडणुकांवरून दिसून येत आहे. जि.प.पं.समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यादृष्टीने तालुक्यातील गटातटात किंवा राजकीय पक्षांमध्ये वरिष्ठ स्तरासह स्थानिक पातळीवर युत्या होण्याची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी आणि रविवारी पक्षीय स्तरावर झालेल्या भेटीगाठींचा विचार करता तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि वरिष्ठ स्तरावरील सामंजस्य करार यात मेळ न बसल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची युती करमाळ्यात दिसून येणार नाही अशी स्थिती जाणवते आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार तथा अजितदादा पवार राष्ट्रवादीचे समर्थक मा.आ. संजयमामा शिंदे यांच्यात समेट जुळवण्याचा प्रयत्न अजितदादांकडून झाला असला तरी विधानसभेच्या गतपंच वार्षिक मध्ये तत्कालीन आमदार शिंदे यांच्या सोबत असलेले मा. आ. जयवंतराव जगताप तसेच करमाळा तालुक्यातील सावंत गट 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार पाटील यांच्यासोबत होते. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संतोष वारे हेही जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असून वरील सर्व नेत्यांचे प्रतिनिधी पांडे जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक असल्याने उमेदवारी कोणाला द्यावी हा पेच निर्माण होत असल्याने दोन्ही राष्ट्रवादीची युती बारगळल्याचे सांगण्यात येत आहे.

इकडे महायुतीतीलच भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष म्हणजेच तालुक्यातील बागल आणि माजी आमदार शिंदे गट एकत्र येण्याच्या वावड्या ही उठत होत्या. मात्र नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच या वावड्यांना कोणतेही तथ्य नसल्याचे दोन्हीही गटांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या युतीची ही शक्यता दिसून येत नाही.

दरम्यान सर्वच गटांनी आपापल्या समर्थकांचे मेळावे आणि विचार विनय बैठकांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचा दावा केला असून या दृष्टीने रविवारी करमाळ्यातील भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्याकडून तर जेऊर येथे विद्यमान आमदार पाटील गटाच्या अभ्यासू मातब्बरांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. यासोबतच माजी आमदार शिंदे आणि माजी आमदार जगताप यांच्याकडूनही जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांतून इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील राजकीय गटांचे समर्थक कार्यकर्ते आणि नेत्यांची पक्षीय पाठबळाच्या दृष्टीने संभावित युती यांचा मेळ घालणे जवळपास दुरापास्त दिसत आहे. वरिष्ठ स्तरावर खल विकल करूनही कोणतीही समीकरणे जुळत नसल्याने तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चौरंगीच होण्याची चिन्हे आहेत.

.

.

.

