करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शनिवार दि.३१ रोजी सायं. ६ ते १० या वेळेत विकी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनात देशातील विविध राज्यांच्या लोकगीतांवर मनमोहक नृत्याविष्कार सादर करत अखंड भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडवून दिले.

यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा मोहिनी सावंत, स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता कांबळे, मुख्याधिकारी सचिन तपसे, नगरसेविका चैताली सावंत, स्वाती फंड, सामाजिक कार्यकर्त्या शितल करे पाटील, शशिकांत केकान, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रा.डॉ. महेश निकत, बाल विकास अधिकारी सूर्यवंशी, बाळासाहेब नरारे, पत्रकार सुहास घोलप, विशाल परदेशी उपस्थित होते. प्रतिमा व दीप प्रज्वलन करून आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मान्यवरांच्या स्वागतपर सत्कारानंतर २०२४/२५ या शैक्षणिक वर्षात दहावीत प्रथम आलेल्या तसेच विविध खेळांमध्ये राज्यस्तरीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी यश श्रीपाद आडकर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शाळेच्या सर्वेसर्वा सौ. सुनिता देवी यांनी प्रास्ताविकातून शाळेचा आढावा व नवीन योजनांची माहिती दिली. प्रा.करे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सौ. देवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक वृंदाच्या सहभागातून चालणाऱ्या शालेय शिक्षण पद्धतीसह वर्षभर घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत शाळेला रु. २५,००० चे बक्षीस जाहीर केले.

यानंतर शाळेच्या बाल वारकऱ्यांच्या स्वागत गीताच्या सादरीकरणाने स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकगीतावर त्या राज्याचा पेहराव परिधान करत विद्यार्थ्यांनी अखंड भारतातील विविधता दाखवली आणि ऑपरेशन सिंदूर वर आधारित देशभक्तीपर नाट्यछटेद्वारे या विविधतेतील एकतेचा उत्कृष्ट नमुना सर्वांपुढे मांडला. याशिवाय मनोरंजनात्मक विनोदी गीतांवर नृत्य सादर करत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमा दरम्यान सौ. शीतल करे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊ साठी रु.५,००० बक्षीस म्हणून दिले तर प्रज्योत दोशी यांनी खाऊ वाटप केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, संचालक विजयकुमार दोशी, अमोद संचेती, चंद्रकांत देवी, यशराज दोशी यांच्यासह महादेव फंड, जितेश कटारिया, सुनील घोलप, अभिजीत वाशिंबेकर, चंद्रकांत चुंबळकर, निर्मला गिरधरदास देवी, आसादे मॅडम, अंजली श्रीवास्तव, टांगडे मॅडम, सारिका विटूकडे, मुसळे मॅडम, कापसे मॅडम, स्वाती माने, ललिता वांगडे, अंजली वांगडे, नेटके मॅडम, अश्विनी दोशी, मंजू देवी, रेखा देवी, भारती देवी, जया शहा आणि करमाळा अर्बन बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.

सौ. सविता बागल, सौ. मेघाली शेटे, सौ. स्वाती काळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालक वर्गाने मोठी गर्दी केली होती. यासोबतच या कार्यक्रमाचे यु ट्युब द्वारे लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आले होते. सदरच्या कार्यक्रमासाठी अक्षय कांबळे व वैष्णवी देशमाने यांनी कोरीओग्राफी केली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने परिश्रम घेतले.

