March 1, 2026
IMG-20260112-WA0092

करमाळ्यातील मेळाव्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद

करमाळा, प्रतिनिधी – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजितदादा पवार गट ) कार्यकर्ता मेळावा सोमवार दि.१२ रोजी शहरातील नालबंद मंगल कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी जि.प., पं.समिती निवडणूक स्वबळावर लढविण्याचा आग्रह मा.आ. संजयमामा शिंदे यांच्याकडे धरला.

या मेळाव्यामध्ये ॲड.अजित विघ्ने, ॲड. नितीन राजेभोसले, अण्णासाहेब पवार, सुजित बागल, रोहिदास सातव, दत्तात्रय अडसूळ, भरत अवताडे, दादासाहेब जाधव, विनय ननवरे, रवींद्र वळेकर आदींनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित दादा पवार ) गटाने संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढवावी असा नारा दिला. कुर्डूवाडी नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश संपादन केलं तसेच यश मतदारांच्या विश्वासाच्या बळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत निश्चितच मिळेल असा ठाम विश्वास या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला.

यावेळी व्यासपीठावर बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, तात्यासाहेब मस्कर, चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, नवनाथ भांगे, ॲड. गिरंजे, विलास पाटील, तानाजी झोळ, विलास राऊत, अशोक पाटील, विवेक येवले, पोपट सरडे, निळकंठ अभंग, तात्यासाहेब जाधव, चंद्रहास निमगिरे, सुहास रोकडे, नानासाहेब नीळ, उद्धव माळी, नानासाहेब लोकरे, नानासाहेब मोरे, प्रकाश थोरात, तात्या सरडे, राजेंद्र धांडे, डॉ. गोरख गुळवे, राजेंद्र बाबर, विनय ननवरे, आर.आर. बापू साखरे, अभिजीत पाटील, शंकर जाधव, सुदाम शेळके, सुहास साळुंखे, राजाभाऊ देशमुख, सोमनाथ रोकडे, संदीप तळेकर, बाळासाहेब ढेरे, मयूर पाटील, गौरव झांजुर्णे, गणेश गुंडगिरे, बाळासाहेब पाटील, उमेश इंगळे, महेश गणगे, अनिल शेजाळ, रवींद्र वळेकर, अशोक तकिक, प्रमोद बदे, विकास गोंदकर, युवराज गपाट, राहुल कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःची लायकी तपासावी – मा.आ. संजयमामा शिंदे

ज्यांचे स्वतःचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. ज्यांनी केवळ खंडणी आणि हप्ते मिळत नाहीत म्हणून तहसीलदारांवर हक्कभंग आणला. कंत्राटदार टक्केवारी देत नाही म्हणून ज्यांनी दहिगाव योजनेचे पाईप जाळून काम बंद पाडण्याचे पाप केले, असे लोक आज माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, त्यांची ती लायकी नाही अशी सणसणीत चपराक शिंदे यांनी विरोधकांना लगावली. मी विकास कामे करणारा कार्यकर्ता आहे. जातीचे आणि नात्यागोत्याचं राजकारण मी कधीच केलं नाही आणि करणारही नाही. माझ्या विकास कामांची भीती घेऊनच सर्व विरोधक एकत्र येऊन माझा गट तालुक्यातून संपवण्याचे स्वप्न पाहत आहेत. दोन निवडणुकांमध्ये पराभव होऊनही एक कार्यकर्ता सुद्धा आपल्यापासून हललेला नाही हे नैतिक बळ असल्यामुळेच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदार आपल्याला निश्चितच कौल देतील, असा आशावाद मा .आ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभेनंतर झालेल्या आदिनाथ कारखाना निवडणुकीत सभासदांनी 12 पैकी 5 गणांमध्ये आपल्याला लीड दिला. जवळपास 45 टक्के मतदान सभासदांनी दिलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कारखाना सुरू करण्याची पात्रता नारायण पाटलांकडे नाही – सुभाष गुळवे

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे आ. नारायण पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले की, त्यांच्याकडे कारखाना सुरू करण्याची पात्रता नाही. सभासदांनी मोठ्या विश्वासाने कारखान्याची सत्ता आमदारांकडे दिलेली आहे परंतु या आमदाराचा, चेअरमनचा स्वतःचा ऊस पवारांच्या साखर कारखान्याला जात आहे. यांच्याकडून सोन्याचा धूर तर निघणार नाहीच परंतु सभासद शेतकरी बांधवांच्या स्वप्नांची राख रांगोळी मात्र निश्चितच होणार आहे. येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर हा कारखाना निश्चितच लिलावात निघेल कारण, तो कारखाना वाचवण्यासाठी आवश्यक असलेली ताकद आणि कुवत या आमदारांकडे नाही. त्यामुळे यापूर्वी केलेली चूक मतदारांनी पुन्हा न करता संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करावे, असे आवाहन गुळवे यांनी केले.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *