March 1, 2026
IMG-20260121-WA0013

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षित घडामोडी होण्याची शक्यता

करमाळा, प्रतिनिधी – सोमवारी दुपारनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी करमाळ्यात भाजपा आणि राष्ट्रवादीची आगळीवेगळी युती झाल्यानंतर तसेच विद्यमान आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भूमिका ठरल्यानंतर दिग्गजांची शक्ती प्रदर्शन दाखवत करमाळा तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी चढाओढ दिसून आली. दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत एकूण ६५४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याची तसेच जिल्हा परिषदेच्या विविध गटांसाठी एकूण २० तर विविध गणांसाठी एकूण ५१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.

मंगळवारी सकाळी महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या अर्धांगिनी सौ. अश्विनी गणेश चिवटे यांनी सकाळी ११ वाजता श्री कमला मातेचे दर्शन घेऊन शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मोठे शक्ती प्रदर्शन करत वीट गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच आदिनाथचे संचालक ॲड. राहुल सावंत यांच्या पत्नी सौ. ज्योती राहूल सावंत यांनीही नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत आणि नगरसेविका सौ. चैताली सावंत यांच्यासह समर्थक महिलांना सोबत घेऊन पांडे गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. राणी वारे यांनीही पांडे गटातून अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनीही जोरदार मोटार सायकल रॅली काढून हिसरे गणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी शहाजीराव राजेभोसले आणि बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी सौ. वनिता सुभाष गुळवे यांनीही कोर्टी गटातून आपले अर्ज मंगळवारी दाखल केले.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीनंतर जागा वाटपा नुसार त्या त्या गटाच्या समर्थकांनी अर्ज भरले आहेत. मंगळवारी दुपारी खा. मोहिते पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप गट जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे तर विद्यमान आमदार नारायण पाटील आणि तालुक्यातील सावंत गट करमाळा तालुका विकास आघाडी च्या नावाखाली एकत्र आल्याचे बोलले जात होते.

आज बुधवार दि. 21 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. युती केलेल्या गटांच्या समर्थकांची नाराजी, त्यातून होणारी बंडखोरी, उभय पक्षांच्या युतीनंतर समोरील दोन गटांत हात मिळवणी अशा घडामोडी होण्याची दाट शक्यता असून आज दुपारपर्यंत आणखी कोणा कोणाचे अर्ज दाखल होतात आणि गटातटांत आणि पक्षीय राजकारणात काय घडामोडी होतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *