करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातून भाजपाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळ्यात शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. भाजपच्या सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन करमाळा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच्या सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आणणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता विद्यानगर येथील भाजपा कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी पालक मंत्र्यांसह निरीक्षक शशिकांत चव्हाण, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनीता देवी, प्रा. रामदास झोळ, मुस्लिम समाजाचे नेते कलीम काझी यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, शहर व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वत्र विकास कामांचा ओघ सुरू असताना करमाळा शहरातील अव्यवस्था मोडीत काढून विकास कामे करून घेण्यासाठी करमाळा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याशिवाय पर्याय नसल्याचे यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. त्यामुळे सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले घुमरे हे प्रत्यक्षात व्यासपीठावर उपस्थित असल्याने उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चांना लगाम बसला आहे. याशिवाय किरकोळ अपवाद वगळता नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या बहुतेक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांच्यातही समन्वय असल्याचे यावेळी दिसून आले.

.

.

.

.

