बड्या अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेने पाणावले लाभार्थ्यांचे डोळे
करमाळा, प्रतिनिधी – सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवार दि.२२ रोजी करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत येणाऱ्या गावांमधील अभियानाचा आढावा घेतला.

सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत येणाऱ्या करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत गौंडरे, सालसे, उंदरगाव, सोगाव, कोंढार चिंचोली या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी या गावांतील ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांच्याकडून अभियानाचा आढावा घेतला. यासोबतच या अभियानाच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शनही केले.

यावेळी करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्यासह पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

संवेदनशील प्रशासनाचा जिवंत अनुभव…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सालसे येथे झालेल्या गाव भेट व ग्रामपंचायत तपासणीदरम्यान एक अत्यंत भावनिक व प्रेरणादायी क्षण अनुभवास आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कोणताही औपचारिकतेचा आव न आणता थेट जमिनीवर बसून गावातील पात्र दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत स्वनिधीतून (५% दिव्यांग कल्याण निधी) धनादेशांचे आपुलकीने आणि सन्मानाने वितरण केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या संवेदनशील व माणुसकीपूर्ण कृतीमुळे दिव्यांग बांधवांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणि समाधानाचे भाव उमटले.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली ही मदत दिव्यांग बांधवांचा विश्वास आणि आत्मसन्मान जागवणारी व आयुष्याला नवी दिशा देणारी असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे लाभार्थ्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या या कृतीतून ‘सत्ता नव्हे, संवेदना महत्त्वाची…’ हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
