करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील भाळवणी येथील जि.प.प्रा. शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बाल आनंद बाजार व बाल मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल लावून जवळपास दहा हजार रुपयांची उलाढाल केली.

यावेळी भाळवणी परिसरातील ग्रामस्थांसह राज्यभरातून ऊसतोडीसाठी आलेल्या कामगार वर्गाने या बाल विक्रेत्यांकडून खरेदी केली. चिमुकल्या विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करताना मालाची गुणवत्ता आणि केला जाणारा मोलभाव उपस्थितांचे लक्ष वेधत होता. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे म्हणून आयोजित केलेल्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून शाळेच्या शिक्षक वर्गाने पुढील शैक्षणिक वर्षात असा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याचे सांगितले.

या बाल आनंद बाजार व बाल मेळाव्याला रशीद मुलाणी, गणेश शिंदे, कृष्णा शिंदे, अरुण कोपनर, लखन पाडोळे, बाबासाहेब कोपनर, भैय्या धेंडे, भारत सुकळे, छोटू कोपनर, धनंजय शिंदे, रायचंद कोपनर, दिनकर डुकळे, प्रकाश शिंदे, योगेश शिंदे, अंबादास मोरे, बापू धेंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक केले. हा उपक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक संतोष वाघमारे व शिक्षिका शितल गुंजाळ यांनी परीश्रम घेतले.

.

.

.

.

.

