चौकशी करून कार्यवाही करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आश्वासन
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा-माढा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या माढा तालुक्यातील चोभे पिंपरी येथील खडी क्रशरमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल ग्रामस्थांनी शुक्रवारी करमाळा विभागाच्या पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा व्हीएस यांना निवेदन दिले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, चोभेपिंपरी हद्दीत गट नं. २५७ मध्ये बालाजी स्टोन क्रशर व खाण प्रकल्पाकडून पर्यावरण संरक्षण अधिनियमातील तरतुदीचा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांचा सर्रासपणे भंग केला जात आहे. सदर प्रकल्पातून दररोज मोठ्या संख्येने टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे दगड वाहतूक होत असून धूळ, धूर व सततचा उच्च आवाज यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींचे श्वसनासंबंधी आजार वाढले आहेत; शेतजमिनीवर व पिकांवर जाड धुळीचा थर बसल्यामुळे पिकांचे उत्पादन घसरले आहे. रात्री उशिरापर्यंत यंत्रांचा आवाज सुरू असल्यामुळे ग्रामस्थांच्या झोपेचा व मानसिक शांततेचा भंग होऊन सार्वजनिक उपद्रव होत आहे.

याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल अद्याप घेतली गेलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान करमाळा विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी याबाबत महसूल विभागाशी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे.

.

.

