March 1, 2026
IMG-20260222-WA0028

करमाळा , प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि.१९ रोजी साप्ताहिक संदेशचे संपादक ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी अधिकारी ऐश्वर्या फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयुष्याच्या जडणघडणीची पहिली दहा वर्षे ज्या शाळेत ते हसले ,बागडले, रडले, खेळले ती शाळा सोडून जावी लागणार असल्याची रुख रुख यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. यासोबतच गेली दहा वर्षे ज्यांना प्रेमाने आपुलकीने घडवण्यासाठी मार्गदर्शन केले अशा शिक्षकांमध्ये ही हे विद्यार्थी आपल्यापासून दुरावणार असल्याची सल शिक्षक वृंदासह शाळेच्या संचालिका सौ. सुनीता देवी यांच्या एकूण हावभावावरून दिसून येत असली तरी आपल्या अध्ययनातून हे विद्यार्थी ध्येयपूर्तीच्या मार्गावर जाण्यासाठी नवीन वळण घेत असल्याचा अभिमानही शिक्षकांना वाटत होता.

मान्यवरांच्या सत्कारानंतर शाळेच्या सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी आपल्या प्रास्ताविकातून या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी पर्यंत शालेय शिक्षणासह विविध स्पर्धा परीक्षा तसेच इतर उपक्रमांमध्ये मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील कडू गोड आठवणी व्यक्त करत शाळेबद्दल सदैव आदराची भावना जोपासणार असल्याचे सांगितले.

यानंतर शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी समजावून सांगत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या माजी विद्यार्थिनी तसेच कृषी अधिकारी ऐश्वर्या फुलारी यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या परिश्रमाबाबत मार्गदर्शन केले. ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना आयुष्यामधील वेळेचे भान राखत, अध्ययनाला प्रयत्नांची जोड देत, ध्येयपूर्ती गाठून आई-वडिलांची स्वप्नपूर्ती आणि शाळेने आपल्यावर केलेल्या संस्कारांची शिदोरी सांभाळून ठेवण्यासाठी प्रेरित केले.

या कार्यक्रमात इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी दहावी मधील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सर्व नियोजन तसेच सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *