March 1, 2026
IMG-20260221-WA0018(1)

करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – वयोवृध्द दाम्पत्याचा सांभाळ न करता कोर्टातील दावा मागे घेण्यासाठी मुलगा, सुन आणि नातवांकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात आहे. याच त्रासातून वयोवृद्ध दाम्पत्याला या सर्वांनी मिळून मारहाण केली आहे. करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) येथे ही घटना घडली आहे.

याबाबत शेलगाव येथील ८३ वर्षीय महादेव एकनाथ केकान यांनी दि.१८/०२/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते आणि त्यांची पत्नी मंगल शेलगाव येथे राहतात. दोघेही वयोवृध्द असून त्यांचा मुलगा विशाल महादेव केकान, त्याची पत्नी वैशाली विशाल केकान व नातु मयुर विशाल केकाण, करण भालचंद्र केकाण हे त्यांचा सांभाळ न करता त्यांना उपाशीपोटी ठेऊन औषध गोळयांसाठी पैसे देत नाहीत. त्यामुळे महादेव यांनी मुलगा विशाल आणि नातू करण यांच्याविरुद्ध करमाळा कोर्टात दावा दाखल केला आहे. सध्या महादेव यांची मुलगी राणी शिवाजी सानप ही शेती करून त्यांची उपजीविका भागवते. दरम्यान दि. ३०/०१/२६ रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महादेव यांचा मुलगा विशाल, त्याची पत्नी वैशाली व नातु मयुर आणि करण केकान यांनी “कोर्टतील दावा माघारी घ्या” असे म्हणुन महादेव व त्यांची पत्नी मंगल केकान या दोघांना लाथा बुक्कीने मारहाण करुन चाकुचा धाक दाखवून शिवीगाळ व दमदाटी केली.

महादेव यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी विशाल केकान, वैशाली केकान, मयूर केकान आणि करण केकान यांच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार व्हि.डि. पठाडे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *