सुजित बागल यांचा विश्वास…
करमाळा, प्रतिनिधी – विधानसभा, आदिनाथ कारखाना आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील बिघाडीचा महाविकास आघाडीने फायदा घेत विजय संपादन केला असला तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीची ताकत आणि मा.आ. जयवंतराव जगताप यांची साथ यांमुळे भाजपा राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुजित बागल यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर बोलताना बागल यांनी सांगितले आहे की, तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडीचे तुकडे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून काही उमेदवार निवडणूक रिंगणात मध्ये उतरले आहेत तर काही उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. विधानसभा निवडणूकीत माजी आ. जयवंतराव जगताप यांनी महाविकास आघाडीमधील नारायण पाटील यांना आमदार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. मात्र आताच्या जि.प.पं.स. निवडणूकीत जगताप हे महायुतीला पाठिंबा देत स्वतः सक्रिय प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यात इतिहास घडणार असून ९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सुजित बागल यांनी केला आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामधून सोन्याचा धूर काढू असे दिलेले आश्वासन हवेत विरल्यामुळे सभासदांचा विश्वासघात झालेला आहे. दीड वर्ष आमदारकीला पूर्ण होऊनही दीड रुपयाचाही निधी मतदार संघामध्ये आलेला नाही. यामुळे सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात झालेला आहे. ज्यांच्या पाठिंब्यामुळे आमदारकी मिळाली त्याच नेतृत्वाला झिडकारल्यामुळे विद्यमान आमदारांची प्रतिमा मलीन झालेली आहे. याचा परिणाम येत्या निवडणुकीत निश्चितच दिसणार असल्याचा ठोस दावा बागल यांनी केला आहे.

.

.

.

