करमाळा, प्रतिनिधी – सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे निवेदने देऊनही तालुक्यातील कोर्टी मंडलातील शेतकरी २०२३/२४ सालातील दुष्काळ निधीपासून अद्यापही वंचितच आहेत. त्यामुळे हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची विनंती वीट येथील सतीश निंबाळकर यांनी केली आहे.

याबाबत बोलताना निंबाळकर यांनी सांगितले आहे की, तालुक्यातील कोर्टी मंडलातील वीट, कोर्टी, विहाळ, कुंभारगाव, सावडी, राजुरी तसेच हुलगेवाडी आदि भागातील शेतकऱ्यांना अद्यापही २०२३/२४ चा दुष्काळ निधी मिळालेला नाही. सदर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दुष्काळ निधी मिळावा म्हणून आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर भाजपाचे गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मात्र तरी देखील अद्यापही या भागातील शेतकरी दुष्काळ निधी पासून वंचित आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिचलेल्या शेतकरी वर्गाला त्वरित दुष्काळ निधी मिळावा अशी मागणी या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निंबाळकर यांनी केली आहे.

.

.

