समस्यांबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यात मे महिन्यातील अवकाळी तसेच सप्टेंबर, ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. याबाबत युवासेनेचे तालुकाप्रमुख समाधान उर्फ शंभूराजे शाहुराव फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसिल कार्यालयात सोमवारी निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे फार्मर आयडी पासून वंचित असलेले शेतकरी, पेंडिंग फार्मर आयडी, त्याबाबत विशिष्ट कोड टाकून अप्रूवल करण्याची संथ प्रक्रिया, अनुदान जमा झालेल्या शेतकऱ्यांची खाती बँकांकडून गोठवून ठेवणे, फार्मर आयडी व ई केवायसी पूर्ण करून तसेच बाधित यादीत अनुदान मंजूर असून देखील पैसे खात्यावर जमा न होणे, समान क्षेत्र असताना नुकसान भरपाईच्या रक्कमेत तफावत, दुरुस्त यादी पाठवताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन न झाल्याने सरकारच्या घोषणेपेक्षा कमी रकमेची मदत अशा अनेक समस्यांचा पाढा फडतरे यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासमोर वाचला.

यासोबतच मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मंजूर मदत ठराविक गावांतील शेतकऱ्यांनाच मिळाली असल्याचे तसेच अद्याप अनेक गावांतील शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने मे महिन्यातील अवकाळी नुकसानीग्रस्तांची समाविष्ट गावांसह यादी मिळावी, अशी मागणी फडतरे यांनी यावेळी तहसीलदार ठोकडे यांच्याकडे केली. याशिवाय २०२२-२३ व २०२३-२४ मधील काही शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही तसेच तांत्रिक चुकांमुळे काही शेतकऱ्यांच्या मंजूर असलेल्या रकमा परत गेल्याबाबतची लिखित कारणे मिळण्याची मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली.

या निवेदनावर काहीच कार्यवाही झाली नाही तर सोमवार दि.५ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता तालुक्यातील अर्जुननगर फाटा येथे युवासेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही तालुकाप्रमुख फडतरे यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांच्या मागणी ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार ठोकडे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि शंका विचारात घेऊन नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे याबाबतचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करत असल्याचे युवा सेना तालुकाप्रमुख फडतरे यांनी सांगितले आहे.

