March 1, 2026
IMG-20260224-WA0014(1)

हद्दवाढ, टाऊन हॉल, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, दहिगाव पंपींग स्टेशनसह ३८ विषयांना ‘जीबी’ची मंजुरी

करमाळा, प्रतिनिधी – करमाळ्याच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पहीली सर्वसाधारण सभा सोमवार दि.२३ रोजी खेळीमेळीत संपन्न झाली. नगरपालिकेच्या श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिरात मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.

या सभेत शहराच्या हद्दवाढीसह शहरातील दुरावस्थेतील जयप्रकाश नारायण टाऊन हॉल, मुला-मुलींची शाळा नं. ४ समोरील वर्ग खोल्या निष्कासित करणे, दहिगाव पंपींग स्टेशनला दहिगाव येथून विजपुरवठा घेणे, मोकाट कुत्र्यांकरिता शेल्टर हाऊस उभा करणे, मोकाट जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर कारवाई करणे, स्वच्छतेबाबत ठोस पाऊले उचलणे, अभ्यासिका उभारण्यासाठी जागा उपलब्ध करणे यांसह सर्वच्या सर्व ३८ विषय एकमताने मंजूर झाले.

शहरातील सर्वच प्रभागांतील विविध विकास कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणे, प्रभाग दोन मध्ये खुल्या जागेत श्री संत शिरोमणी सावंता महाराज समाज मंदिर बांधण्यासह अनेक महत्त्वाच्या विषयांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय विकास कामे आणि विविध शासकीय योजनांच्या अनुदानापासून करावयाच्या कामांची निवड निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली.

वैशिष्ट्येपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर कामांच्या नावात बदल करण्यावरही या सभेत चर्चा झाली. शहरात वृक्ष संवर्धन समितीची स्थापना करणे, सुभाष चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत व कसाब गल्ली ते कानाड गल्ली पर्यंत नवीन जलवाहिनी टाकणे, आवश्यकतेनुसार शहरात पाण्याची टाकी बनवणे, आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधणे, ओपन स्पेस व उद्यानांची स्वछता करणे, टाऊनहॉल शेजारील रिकाम्या जागेत टाकण्यात आलेला कचरा उचलणे, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले स्वच्छ करणे आदी विषय या सभेत घेतले गेले.

याशिवाय करमाळा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळा अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे व संगणक संच बसवणे, नगरपालिकेच्या सर्व विभागाकडील सर्व कामांच्या निविदा काढण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यासोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ पुरवठ्यासह शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पाच वाहने घेण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

एकूणच करमाळा शहरात विविध विकास कामे करण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्यावर या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वच विषय शहराच्या विकासाशी निगडित असल्याने विरोधातील नगरसेवकांनीही या सभेत सामंजस्याची भूमिका घेतली.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *